Representative Image

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यातील नखासा भागातील एका गावात 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 70 वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 3 मध्ये शिकणारी ही मजुराची मुलगी एका दुकानातून मिठाई घेण्यासाठी गेली असता भाजी विक्रेता मोनीस खानने तिला हाक मारली. ही मुलगी मोनिसला ओळखत होती. अनेकदा आपल्या आईसोबत ती त्याच्या दुकानात गेली होती. त्यामुळे हाक मारल्यानंतर ती त्याच्याकडे गेली.

त्यानंतर मोनिसने तिला चॉकलेट देऊ केले व आत घेऊन तिच्यावर बलात्कार केला. मोनिसचे हे कृत्य एका रहिवाशाने पहिले व त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने गावातील इतरांना याची माहिती दिली. त्यानंतर मोनिसला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नखासा पोलीस स्टेशनचे हाऊस ऑफिसर योगेश कुमार म्हणाले, ‘पीडित तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीवर आयपीसीच्या कलम 376 एबी (12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार) आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे निवेदन नोंद करून घेण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण), शिरीष चंद्र यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. (हेही वाचा: UP Shocker: रस्त्यावर झाडाच्या सावलीला झोपलेल्या व्यक्तीस कारने चिरडले; Video Viral)

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील हरदोई येथूनही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, ही 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी शेताची राखण करत होती. त्यावेळी नात्याने चुलत भाऊ असलेल्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी मुलीचे वडील तिथे आले व त्यांना पाहून आरोपी पळून गेला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.