Unlock 3: आरोग्य मंत्रालयाकडून 5 ऑगस्ट पासून जीम, योगा सेंटर सुरू करण्यासाठी नियमावली जारी
Gym | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 4 महिन्यांपासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान आता हळूहळू कोरोनासोबत जगायला शिकणार्‍या भारतीयांना अनलॉक करून या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे. 5 ऑगस्टपासून भारतामध्ये अनलॉक 3 सुरू होणार आहे. यावेळेस देशात जीम आणि योगा सेंटर यांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आज खास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार कोरोना संकट काळात जीम आणि योगा सेंटरमध्ये कशी काळजी घ्यावी, पुन्हा व्यवहार सुरू करताना कशाचं भान ठेवावं? याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

जीम आणि योगा सेंटरमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

जीम आणि योगा सेंटरसाठी आवश्यक नियमावली

  • कंटेन्मेंट झोन मधील योगा आणि फीटनेस उघडण्यास परवानगी नसेल. 5 ऑगस्ट पासून केवळ कंटेन्मेंट झोन वगळता भागातील सेंटर्स उघडली जाऊ शकतात.
  • केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करणं योगा, जीम सेंटर्सना बंधनकारक असेल.
  • 65 वर्षा वरील को-मॉर्बिडीटी असणार्‍या व्यक्ती, 10 वर्षाखालील मुलं, गरोदर स्त्रिया यांना प्रवेश निषिद्ध असेल. स्टाफ आणि कस्टमर्स दोघांसाठीदेखील हे नियम असतील.
  • दोन व्यक्तींमध्ये 6 फीट अंतर ठेवणं आवश्यक आहे. तसेच फेस मास्क बंधनकारक असेल.
  • क्लिनिकली अप्रुव्ह असलेल्या डिसइंफेटंटने जीममधील,योगा सेंटर मधील भाग नियमित स्वच्छ करणं आवश्यक असेल.
  • प्रवेश द्वारावर हॅन्ड सॅनिटायझर आणि थर्मल गनने तापमान पाहणं बंधनकारक असेल.

इथे पहा संपूर्ण गाईडलाईन

महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये 5 ऑगस्टपासून केवळ आऊट डोअर अ‍ॅक्टिव्हिटीज, खेळ यांना परवानगी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता राज्यात बॅटमिंटन, गोल्फ, रायफल शुटींग असे खेळ पुन्हा सुरू होतील.