The 2 accused in Udaipur beheading case (Photo Credit- IANS)

नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या टेलर कन्हैया लाल साहूची राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरमध्ये (Udaipur) मंगळवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गर्दीच्या बाजारपेठेत त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. एका हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि दुसऱ्याने त्याचा व्हिडिओ बनवल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मात्र, पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. जमावाने जाळपोळही सुरू केली होती.

सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले आहे. उदयपूरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. 600 अतिरिक्त पोलीस येथे पाठवण्यात आले आहेत. सायंकाळी उशिरा राजसमंद येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, गौस मोहम्मद मुलगा रफिक मोहम्मद आणि रियाझ मुलगा अब्दुल जब्बार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही उदयपूरच्या सूरजपोल भागातील रहिवासी आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, 'या हत्येचा तीव्र निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.’ या घटनेनंतर उदयपूरचे जिल्हाधिकारी तारा चंद मीना म्हणाले, 'गुन्हेगाराची जात नसते. कायदा आपले कार्य करत असून, आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. पीडित कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली जाईल. ज्या तरतुदी असतील त्या अंतर्गत कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: राज्यसभेच्या 31 टक्के सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल; तब्बल 87 टक्के खासदार आहे कोट्याधीश- Report)

दरम्यान, अहवालानुसार, कन्हैयालाल यांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली. यामुळे एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या मिळाल्याने कन्हैयालाल चांगलाच घाबरला होता. कन्हैयालालने याबाबत धानमंडी पोलीस ठाण्यात माहिती देऊन सुरक्षेची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी कन्हैयालालला सुरक्षा पुरवली असती किंवा धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली असती तर कन्हैयालालला जीव गमवावा लागला नसता.