Trupti Desai (Photo Credits: ANI)

शनि शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश नाकारत असल्याच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी मंदिरात प्रवेश केलेले आंदोलन आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर काही स्तरातून त्यांचे कौतुक झाले तर काही स्तरातील लोकांना त्यांच्या अशा वागण्याला विरोध केला. मात्र त्यांनी विरोधकांना न जुमानता आपला लढा सुरुच ठेवला. त्यांची ही मोहिम त्यांनी पुढे सुरु ठेवत आज त्या शबरीमला मंदिरात प्रवेश करणार आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, कोची विमानतळाहून निघालेल्या तृप्ती देसाई काहीच वेळात शबरीमला मंदिरात पोहोचतील.

मात्र त्यांना कोणत्याही परिस्थितीत शबरीमला मंदिरात प्रवेश द्यायचा नाही असा पवित्रा तेथील आंदोलकांनी घेतला आहे.

आज संविधान दिन असून ही स्त्रीविरोधी परंपरा मोडीत काढण्यासाठी आजचा दिवस हा आदर्श दिवस असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे. जर कुणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याप्रकरणी आम्ही कोर्टात दाद मागू, असेही त्या म्हणाल्या. माझ्या मंदिरप्रवेशाची माहिती मी केरळ राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना दिलेली असल्याचेही त्या म्हणाल्या. आम्हाला संरक्षण पुरवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे देसाई म्हणाल्या.

आपल्याला मंदिरात प्रवेश करू दिला गेला नाही, तर आपण उपोषण करत याचा निषेध करू असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपल्याला प्रवेश का नाकारण्यात आला याबाबत पोलिसांना लेखी स्वरुपात त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडू असेही देसाई म्हणाल्या.

अजूनही देसाई यांना पोलिसांनी संरक्षण पुरवले नसले, तरी देखील आमचे त्यांच्या प्रवासावर पूर्ण लक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. तृप्ती देसाई यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पोलीस नजर ठेवून असून ते देसाईंना मंदिर प्रवेश करू देणार नाहीत असे सांगण्यात येत आहे.