तिरुपती बालाजी मंदिर (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येने 9 लाखाचा आकडा पार केला आहे. याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणत मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी भारतामध्ये सुरुवातीच्या काळात जी काही मंदिरे सुरु झाली त्यामध्ये, आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिराचा (Tirupati Temple) समावेश होता. मात्र आता मिळत असलेल्या बातमीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (Tirumala Tirupati Devasthanam) 15 पुजाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत टीटीडीचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी, गुरुवारी मंदिरातील पुजारी, आरोग्य कर्मचारी आणि दक्षता अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

तिरुमला तिरुपतीमधील ही अशी दुसरी घटना आहे. यापूर्वी टीटीडीच्या 17 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी आपत्कालीन बैठकी (Emergency Meeting) नंतर सांगितले की, याआधी संक्रमित लोकांमध्ये एक सहायक पुजारी, काही संगीतकार आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. टीव्हीटी बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, कोविड-19 संसर्गानंतर मंदिर बंद करण्यात आले आणि ते पुन्हा 11 जून आणि दररोज भाविकांसाठी उघडले गेले. रविवारी सिंघल म्हणाले होते की, आजपर्यंत देवस्थानच्या 91 कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

याबाबत पुजारी रमाना दिक्षीतुलू (Ramana Dikshitulu) यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, '50 पैकी 15 पुजाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे व 25 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. टीटीडी ईओ आणि एईओ यांनी दर्शनासाठी मंदिर बंद केले आहे.’ (हेही वाचा: भारतात 17 जुलैपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा; जाणून घ्या कोणते देश आणि एअरलाईन्स कंपन्या चालवतील उड्डाणे)

दरम्यान, कोणत्याही भाविकांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती संस्थानने दिली आहे. देवस्थानकडून, 18 ते 24 जून दरम्यान, 700 भाविकांना कॉल केला होता व 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान 1,943 भाविकांना कॉल केला होता. सर्वांनी ते ठीक असल्याचे सांगितले.