पटना उच्च न्यायालयात (High Court of Patna) न्यायमूर्ती हेमंतकुमार श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती प्रभात कुमार सिंह यांच्या खंडपीठाने, हिंदू लग्नसंस्थेबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, पहिल्या पत्नीच्या संमतीने, तिच्या हयातीत पुरुषाला दुसरे लग्न (Second Marriage) करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच पहिल्या पत्नीची संमती असली तरी पुरुषाने केलेले दुसरे लग्न ग्राह्य धरले जाणार नाही. अपीलकर्ता इम्फाळमधील केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) सहाय्यक सब-इंस्पेक्टर म्हणून काम करीत होते. त्यांनी सुनीता उपाध्याय (सीआरपीएफमध्ये हवालदार म्हणून कार्यरत) सोबत दुसरे लग्न केले, या प्रकरणावर न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.
अपीलकर्त्याची पहिली पत्नी रंजू सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपीलकर्त्याविरोधात विभागीय कार्यवाही सुरू करण्यात आली. विभागीय कार्यवाही पूर्ण झाल्यावर अपीलकर्ता दोषी ठरला व त्याला खात्यातून काढून टाकण्यात आले. सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हे अपील फेटाळून लावत म्हटले की, ‘अपीलकर्त्याच्या लग्नासाठी त्याच्या पहिली पत्नीची संमती त्याला दुसरे लग्न करण्याची परवानगी देत नाही. ‘ (हेही वाचा: Vivah Shubh Muhurat 2019-2020: यंदा विवाहाचे शुभ मुहूर्त फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वाधिक; पहा पुढील वर्षभरातील लग्नाच्या तारखा)
या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना अपीलकर्त्याच्या (सीआरपीएफ अधिकारी) वकीलाने नमूद केले आहे की, चौकशीच्या वेळी पत्नीने आपल्याला मूळ-बाळ नसल्याने दुसऱ्या विवाहाला संमती दिली असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले गेले होते. मात्र ते खोटे असल्याचे ठरवून चौकशी सुरु झाली. अखेर न्यायालयाने हे दुसरे लग्न अमान्य केले आहे. दरम्यान, हिंदू विवाह कायद्याच्या कलम 5 (1) नुसार, पती, पत्नी दोघांचेही जोडीदार हयात नसतील किंवा ते एकत्र राहत नसतील तरच दुसऱ्या विवाहाची परवानगी आहे.