कोरोना व्हायरस (Coronavirus) या महामारीमध्ये जवळजवळ प्रत्येक देशाने अनेक महत्वाच्या व्यक्ती गमावल्या आहेत. भारतामध्येही साहित्यिक, पोलीस, डॉक्टर असे अनेकजण या काळात मरण पावले. आता प्रख्यात ज्योतिषी बेजान दारूवाला (Shri Bejan Daruwalla) यांचे शुक्रवारी कोरोना विषाणूमुळे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी गुजरातच्या अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र यासंदर्भात बेजन दारूवाला यांचा मुलगा नस्तूर दारूवाला यांनी, न्यूमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिव्य भास्करशी बोलताना सांगितले. 11 जुलै 1931 रोजी गुजरातच्या अहमदाबादमधील पारशी कुटुंबात जन्मलेले बेजन दारूवाला इंग्रजीचे प्राध्यापक देखील होते.
त्यांच्या निधनावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘प्रसिद्ध ज्योतिषी श्री बेजान दारूवाला यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. मी त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना करतो. ओम शांती...’
Saddened by the demise of renowned Astrologer Shri Bejan Daruwalla. I pray for the departed soul. My condolences. Om Shanti...
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) May 29, 2020
दारूवाला यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांना या महिन्याच्या सुरूवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि न्यूमोनियासारखी लक्षण दिसून आली होती. या आठवड्याच्या सुरुवातीच्या अहवालांमध्ये असा दावा केला गेला आहे की, त्यांना कोरोना व्हायरस झाला आहे. बेजान यांचे भविष्य देशभरातील अनेक वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध होत होते. बेजान दारूवाला यांनी 25 एप्रिल 2003 रोजी मुंबईतील हॉटेल ताज येथे, आपल्या ज्योतिषशास्त्राच्या वेबसाइटचा शुभारंभ केला होता. 2014 मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा तसेच संजय गांधी अपघाताचाही अंदाज बेजान दारूवाला यांनी वर्तविला होता. (हेही वाचा: Coronavirus मुळे मरण पावलेल्या लोकांसाठी स्पेनमध्ये 10 दिवसांचा दुखवटा सुरु)
पारसी घरात जन्मूनही श्री दारूवाला गणेशाचे भक्त होते. त्यांचे ज्योतिष तंत्र हे आय-चिंग, टॅरो रीडिंग, कबालाह आणि भारतीय हस्तरेखाशास्त्र आणि पाश्चात्य ज्योतिष यांना जोडते. या सर्वांच्या आधारावर ते भविष्य वर्तवत असत. श्री. बेजान हे त्यांच्या अचूक भविष्यवाण्याबद्दल जगभरात ओळखले गेले होते.