Lockdown: घरी परत जाण्यासाठी कामगारांची वणवण; महिलेने स्वतःला बैलगाडीला जुंपून पार केला रस्ता, पहा विदारक व्हिडिओ
महिलेने स्वतःला बैलगाडीला जुंपले (Photo Credit : Twitter)

भारतामध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) शिरकाव केला आणि क्षणार्धात सर्वच चित्र पालटले. लॉक डाऊन (Lockdown) सुरु झाले, व्यवसाय बंद पडले परिणामी अनेक मजुरांना, कामगारांना हलाखीच्या परिस्थितीमध्ये शहरातून आपल्या गावी धाव घ्यावी लागली. अशात अनेक मजूर वाहनांची व्यवस्था न झाल्याने पायी हजारो किलोमीटरचा रस्ता तुडवत आहेत. अशाच कुटुंबाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या कुटुंबांसाठी स्वतः बैलगाडी (Bullock Cart) हाकताना दिसत आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशातील मऊ येथून इंदूरला नायता मुंड येथील घरी जात होते.

पहा व्हिडिओ - 

बैलगाडीने जात असताना वाटेत पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना एक बैल विकावा लागला, ज्यामुळे कुटुंबातील महिलेने स्वतःलाच बैलगाडीला जुंपून घेतले. इंदोर बायपास येथे या कुटुंबाचा हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये महिलेसोबत अजून दोन पुरुष दिसत आहेत. कधी ही महिला तर कधी पुरुष असे आळीपाळीने बैलगाडी ओढत होते. या विदारक दृश्याचा व्हिडिओ अनेकांनी शेअर करून दुःख व्यक्त केले आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही शिवराज सरकारवर निशाणा साधला आहे.

कमलनाथ यांनी लिहिले आहे की, ‘शिवराजजी डोळे उघडून झोपेतून उठा, या असहाय्य कामगारांची अवस्था पहा, त्यांची काळजी घ्या. वल्लभ भवनमधून सरकारला बाहेर काढा. आपले सर्व दावे पोकळ ठरत आहेत. राज्याच्या सीमेवर, प्रमुख रस्त्यांवर अजूनही कामगारांचे लोंढे आहेत व त्यांची काळजी घेण्यास कोणीही नाही.’ कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.