Lal Bahadur Shastri (File Image)

56 वर्षांपूर्वी, चित्तौरगड जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची तुला करण्यासाठी ठेवलेले 56 किलो सोने आता केंद्र सरकारकडे जमा होणार आहे. हे सोने केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्याचे निर्देश जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दिले. 1965 मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा चित्तोडगड येथे येण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी बड़ी सादड़ी येथे राहणाऱ्या गणपत लाल अंजना यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना शास्त्रीजींचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या वजनाचे 56 किलो 857 ग्रॅम सोने भेट दिले होते. सध्या हे सोने उदयपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे.

सांगितले जात आहे की, त्याच दरम्यान शास्त्रीजी यांचे निधन झाले आणि ते चित्तोडगडला येऊ शकले नाहीत व त्यामुळे हे सोने प्रशासनाकडेच राहिले. दरम्यान, हे सोने परत मिळविण्यासाठी अंजना कुटुंबीयांनी मोठा न्यायालयीन लढा दिला पण त्यांच्या पदरी निराश आली. त्याच वेळी, चुकीच्या हेतूने सोने विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप लावण्यात आला. या प्रकरणात उदयपूरच्या खालच्या कोर्टात गणपतलाल अंजनासह चार जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. डीजे कोर्ट आणि हायकोर्टाने नंतर सर्वांना निर्दोष सोडले मात्र हे सोने गोल्ड कंट्रोल ऑफिसरकडे जमा करण्यास सांगितले. (हेही वाचा: Baba Ramdev यांनी पुन्हा लॉन्च केली COVID 19 वरील औषधं आता WHO कडून सर्टिफाईड आहे Coronil)

56 वर्षांपूर्वी या सोन्याची किंमत 4.76 लाख होती, परंतु आता ती जवळजवळ 28 कोटी आहे. या प्रकरणाची विविध न्यायालयात 5 वेळा सुनावणी झाली आहे. 1962 च्या युद्धामुळे देशात अन्नधान्याची कमतरता होती. हे लक्षात घेता तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी गोल्ड कंट्रोल कायद्यांतर्गत गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सोन्याचे बाँड घेणाऱ्या व्यक्तीची चौकशी न करण्याची तरतूद होती. त्याच योजनेत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गणपत लाल अंजनाने 10 डिसेंबर 1965 रोजी हे सोने जमा केले होते.