Terrorist Attack in Jammu and Kashmir: कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान शहीद
Photo Credit-X

Terrorist Attack in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कठुआ(Kathua) जिल्ह्यात सोमवारी 8 जुलै रोजी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे 5 जवान शहीद (soldiers martyred)झाले आहेत. तर इतर 5 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 3 दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी तेथे सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचाही अंदाज आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी कठुआ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहाई मल्हार येथील बदनोटा गावाजवळ भारतीय लष्कराचे वाहन नियमित गस्त घालत होते हे ठिकाण कठुआ शहरापासून 150 किमी अंतरावर आहे. हल्ल्यावेळी जवळपास 10 जवान तेथे होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सर्व जवान प्रभावित झाले. त्यानंतर तेथे अंदाधुंद गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले. तर पाच जवान गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा जंगलात पळून गेले. हल्लेखोरांना निष्प्रभ करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तातडीने या भागात रवाना करण्यात आले.

श्रद्धांजली वाहताना राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लिहिले की, 'कठुआ चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांप्रती मी शोक व्यक्त करतो. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पोलिस आणि निमलष्करी दलाची संयुक्त कारवाई सुरू आहे. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल'.

.