Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली असून, मृत्यूपूर्वी त्याने भगवान शिवाला भावनिक पत्र लिहून आपले नशीब का असे लिहिले, असा सवाल केला होता. या घटनेने पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. मृत तरुणाची ओळख रोहित अशी करण्यात आली आहे. त्याने MSc पूर्ण केल्यानंतर B.Ed करत होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्याचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते, परंतु ते पूर्ण न झाल्यामुळे तो खूप निराश झाला होता.

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रोहितने लिहिले, शिवा, सर्वज्ञ असूनही तू माझं नशीब असं का लिहिलंस? तुझ्या स्वतःच्या मुलासाठीही असंच लिहिलं असतंस का? आम्ही तुझेच लेकरं नाही का? पुढे तो लिहितो, जगण्याचं दुःख हे मृत्यूपेक्षा जास्त आहे. खूप वेळा प्रयत्न करून थकलोय. कदाचित हेच माझं नशीब आहे. त्याने हेही लिहिले की, त्याला जीवनात अनेक चांगल्या हृदयाचे, निर्मळ आत्मे लाभले पण उर्वरित लोकांबद्दल विसरणंच चांगलं ठरेल.

कुटुंबीयांनी सांगितले की, रोहित अनेकदा नाराज असायचा आणि आपल्या आयुष्याबद्दल अस्वस्थ वाटायचं. ही घटना तरुणांमध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाच्या समस्यांकडे लक्ष वेधणारी आहे.

पोलीसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, हैदराबादमधील 27 वर्षीय महिला 20 जून रोजी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीप्रमाणे ही आत्महत्या असू शकते, मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी सुरू आहे.

सुषमा असे तिचे नाव असून, ती सिकंदराबादमधील अड्डागुट्टा भागात राहत होती आणि Hitech City येथील Diebold Nixdorf कार्यालयात काम करत होती. घटनेच्या दिवशी ती रोजप्रमाणे ऑफिसला गेली होती, मात्र रात्री घरी परतली नव्हती. या दोन्ही घटना तरुणांमध्ये मानसिक आरोग्य, करिअर आणि जीवनातील संघर्षांशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.