Mumbai Marathon 2020: मुंबईकर धावण्यासाठी सज्ज, उद्या पहाटेपासून सुरु होणार टाटा मुंबई मॅरेथॉन 2020, जाणून घ्या सर्व माहिती
Mumbai Marathon | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Marathon 2020: आरोग्य आणि सामाजिक जागृतीचा संदेश घेऊन मुंबईकर रस्त्यांवरुन धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या (रविवार, 19 जानेवारी 2020) पहाटे तीन वाजलेपासून ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धा सुरु होत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मॅरेथॉन (Mumbai Marathon) स्पर्धेचा सर्वासामान्य नागरिक आणि मुंबईकर यांना कोणताही अडथळा येऊ नये. वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा ताण पडू नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकच्या अतिरिक्त रेल्वेगाड्याही सोडण्यात येणार आहेत. स्पर्धेदरम्यान पार्किंग, बस मार्ग, लोकल वेळापत्रक, आरोग्य सेवा कशी असेल घ्या जाणून.

दरम्यान, पहाटे तीन वाजलेपासून स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे काही स्पर्धकांना ते निघणार असलेल्या ठिकाणांपासून स्पर्धा सुरु होण्याच्या ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो. नेमकेपणाने सांगायचे तर, सुरुवात वरळी डेअरीपासून होणार आहे. मात्र, कोणतेही वाहन तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांसाठी वाहने उभी करण्यासाठी फिनिक्स मॉल हा अखेरचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे फिनिक्स मॉल ते वरळी डेअरी हे सुमारे दोन किलोमिटर इतके अंतर पार करुन स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी यावे लागेल. सीएसएमटी येथाही असाच काहीसा प्रकार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी उपनगरीय लोकलसेवा हा पर्याय निवडल्यास होणारा विलंब आणि गैरसोय टाळता येऊ शकते.

स्पर्धेदरम्यान बंद असलेले मार्ग आणि वाहनतळ

  • दक्षिण, मध्य मुंबईमध्ये येणारे सुमारे 71 मार्ग रविवारी पहाटे पाच ते दुपारी 2 या काळासाठी बंद असणार आहेत.
  • 28 प्रमुख रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रबंद
  • मुंबईतील सर्व सार्वजनिक, स:शुल्क वाहनतळांचा वापर करता येणार.
  • दक्षिण, मध्य मुंबईतील बेस्ट आगारांमध्येही वाहने उभी करण्यास मान्यता.

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान अतिरीक्त लोकल फेऱ्या

मध्य रेल्वे मार्गासाठी पहाटे 3 वाजता (रविवार) कल्यान स्थानकावरुन धिमी लोकल सिएसएमटीच्या दिशेने रवाना होईल. जी दिवा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवरुनही धावेल.

हार्बर रेल्वे मार्गासाठी पनवेल स्थानकावरुन सकाळी 3.10 वाजता एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने रवाना होईल.

पश्चिम रेल्वे मार्गासाठी विरार रेल्वे स्थानकावरुन 18 जानेवारीच्या मध्यरात्री 2.20 वाजता लोकल सुटेल जी 19 जानेवारीच्या पहाटे 4.2 वाजता चर्चगेट रेल्वेस्थानकावर पोहोचेल.

बोरिवली रेल्वे स्थानकावरुनही 19 जानवेरीला पहाटे 3.15 वाजता एक लोकल धावणार आहे.

बससेवा वाहतूक मार्गात बदल

मॅरेथॉन स्पर्धेमुळे बेस्ट बस वाहतूकीवरही परिणाम होणार आहे. बेस्ट बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही बस अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक 105,106, 108, 112, 123, 125, 132, 133, 136 आणि 155 हे काही काळासाठी (तात्पुरते) रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या रस्त्यांवरील बसचौक्याही दुपारी 3.30 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा, नेव्हीनगरकडे असे असणारे बसमार्ग हे सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडीबंदर, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग या मार्गे राहतील.

मुंबई पोलीस ट्विट

मुंबई मॅरेथॉनसाठी एकूण 7 स्पर्धा- वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पूर्ण मॅरेथॉन- पहाटे 5.15

10 किलोमीटर-स. 6.20

एलिट स्पर्धा -स. 7.20

अपंगांसाठी स्पर्धा – स. 7.25

ज्येष्ठ नागरिक – स. 7.45

ड्रीम रन – स. 8.05

वरळी डेअरी

अर्ध मॅरेथॉन-पहाटे 5.15

कशी आणि कोठे असेल वाहनतळ व्यवस्था

मॅरेथॉन स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांच्या वाहनांसाठी प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, विधानभवनाबाहेर, बॅलार्ड पीअर आणि टाटा मार्गावरील महापालिकेचे वाहनतळ, केशवराव खाडे मार्ग, कुरणे चौक ते वरळी नाका, सेनापती बापट मार्गाच्या दोन्ही बाजू, वडाचा नाका ते शिंगटे मास्तर चौक, एन. एम. जोशी मार्गाच्या दोन्ही बाजू, शिंगटे मास्तर चौक ते चिंचपोकळी रेल्वे स्थानक चौक, माटुंगा रोड रेल्वे स्थानक ते मच्छीमार वसाहत, एलफिन्स्टन चौक ते माहीम चौक या मार्गावर वाहने उभा करण्यास स्पर्थकांना मुभा आहे.

दरम्यान, स्पर्धेवेळी होणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी ध्यानात घेऊन स्पर्धा मार्गांवर असलेल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे एक पथक तैनात असेन. त्यासोबतच विविध ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केलेल्या असतील. रुग्णवाहीका कमीत कमी वेळेमध्ये रुग्णालयात पोहोचविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा रायडरही सज्ज असणार आहे. एकूणच काय तर उद्या पहाटे धावण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत.