
तमिळनाडूच्या (Tamil Nadu) वेल्लोरमधून (Vellore) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील वेल्डरचे काम करणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. रिपोर्टनुसार, वेल्लोर जिल्ह्यातील अदुक्कंबराई येथील हा हा नराधम बाप गेल्या 10 महिन्यांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता.
सरकारी शाळेत आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीला पोटात दुखू लागल्याने तिला वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ती गरोदर असल्याचे समजले आणि त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मंगळवारी (2 ऑगस्ट 2022) अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला तेव्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिली. यानंतर समितीने वेल्लोर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर वेल्लोर पोलिसांच्या पथकाने या संदर्भात अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली. चौकशीत तिने सांगितले की, तिचे वडील गेल्या 10 महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण करत होते. यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना पोक्सोसह इतर विविध कलमान्वये अटक केली. वडील वेल्लोरमधील एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये वेल्डरचे काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीचे पालक 8 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. मुलगी आणि तिचा भाऊ त्यांचे वडील आणि आजोबांसोबत राहत होते. (हेही वाचा: Crime: संशयातून पती नेहमी करायचा मारहाण, आईच्या मदतीने केली हत्या, पत्नीसह सासू अटकेत)
आजीने दिलेले जेवण पोचवण्यासाठी मुलगी रोज तिच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी जायची. यावेळी तिचे वडील तिच्यावर बलात्कार करायचे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी हा बाप आपल्या मुलीला देत असे. मुलीने सांगितले की, ती खूप घाबरलेली होती व त्यामुळे याबाबत ती कोणाकडे काही बोलू शकली नाही.