Tamil Nadu: पंचायतीच्या बैठकीत जातीय भेदभाव; सर्वांना खुर्च्या, दलित महिलेला जमिनीवर बसण्यास भाग पाडले, सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Flickr)

जात आणि धर्मातील भेदभाव (Caste Discrimination) दूर करण्यासाठी सरकार जागरूकता मोहीम राबवित आहे. मात्र देशात असे अनेक प्रदेश आहेत जिथे अजूनही जातीयता आणि त्याबाबतचा भेदभाव दिसून येतो. नुकतेच तामिळनाडू राज्यातील कुड्डोलर (Cuddalore) येथे एक पंचायत बैठक (Panchayat Meetings) आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी प्रत्येकाला बसायला खुर्ची देण्यात आली होती मात्र फक्त दलित असलेल्या महिला पंचायत अध्यक्षांशी जातीभेद करून त्यांना चक्क जमिनीवर बसवण्यात आले. या अध्यक्षांचा गुन्हा इतकाच होता की त्या दलित आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून पंचायत सचिवांना (Panchayat Secretary) निलंबित करण्यात आले आहे.

कुड्डोलरमध्ये पंचायत अध्यक्षांच्या बैठकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बैठकीत मागासवर्गीय पंचायत अध्यक्ष महिलेला (दलित) खाली बसवले आहे व बाकीचे लोक खुर्चीवर बसलेले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यावर, सीपीएम पक्षाने पंचायत सचिवांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीपीएमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता याप्रकरणी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तक्रार दाखल केलेल्या सीपीएमच्या म्हणण्यानुसार, बैठकीत अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या मात्र तरीही पंचायत अध्यक्षांना खाली बसण्यास सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. जातीच्या आधारे कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करणे हा गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीला एससी/एसटी कायद्यांतर्गत अटक केली गेली असेल तर त्याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही, मात्र एफआयआर मागे घेण्याचा कोर्टाला अधिकार आहे.

या प्रकरणात पीडितेने सांगितले की, ‘प्रजासत्ताक दिनी मला ध्वज फडकविण्याची परवानगी नव्हती.’ हिंदू असलेल्या उप-अध्यक्षांच्या वडिलांनी ध्वजारोहण केले. आता उपाध्यक्ष आणि प्रभागातील इतर सदस्यांनी माझा अपमान केला आणि मला व दलित प्रभागातील आणखी एका सदस्याला जमिनीवर बसण्यास भाग पाडले.’