तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सालेम (Salem) जिल्ह्यामधून अतिशय धक्कादायक आणि अमानवीय घटना उघडकीस आली आहे. गंभीरपणे आजारी असलेल्या 74 वर्षांच्या दिव्यांग वृद्धाला मारण्यासाठी कुटूंबाने फ्रीजरमध्ये बंद करून ठेवले होते. बॉक्समध्ये श्वास घेण्यासाठी तळमळत असलेल्या वृद्धांची अखेर मंगळवारी सुटका करण्यात आली. आजारी असलेल्या या वृद्धाच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या एक दिवस आधीच रुग्णालयातून सोडवून घेतले. त्यानंतर या नातेवाईकांनी वृद्धाला एका फ्रीझर बॉक्समध्ये रात्रभर झोपवले ज्यात मृतदेह ठेवले जातात.
या वृद्धाच्या भावाने एका एजन्सीकडून हा फ्रीझर बॉक्स भाड्याने घेतला होता. जेव्हा एजन्सीचा कर्मचारी फ्रीझर बॉक्स परत घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की बॉक्समध्ये वृद्ध व्यक्ती तळमळत पडून आहे. त्यानंतर त्वरीत त्याने मदत मागवून या वृद्धाला वाचवले. बालसुब्रमणिया कुमार (Balasubramania Kumar) असे पीडितेचे नाव असून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्ध व्यक्ती गंभीर अवस्थेत असूनही नातेवाईकांनी डिस्चार्ज का घेतला? वृद्धाच्या भावाने फ्रीझर बॉक्स ऑर्डर का केला? भावाला या वृद्धाला मारायचे होते का? अशा गोष्टींचा तपास केला जात आहे. (हेही वाचा: उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील निद्राधीन तीन अल्पवयीन मुलींवर अॅसीड हल्ला; गोंड येथील घटना)
मृतदेह नेण्यासाठी मोफत वाहन पुरविणारे वकील देवलिंगम यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा ते ताबडतोब वृद्धाच्या घरी पोहोचले. याबाबत बोलताना ते म्हणाले. ‘एजन्सीच्या कर्मचाऱ्याने मला एका वृद्धाला रात्रभर फ्रीझर बॉक्स मध्ये ठेवल्याची माहिती दिली. मात्र कुटुंबाने सांगितले की, आत्मा निघून जाण्यासाठी तडफडत आहे व आम्ही वाट पाहत आहोत.’ आता पोलिसांनी ‘दुर्लक्ष करून एखाद्याचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करण्याचा’ गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वृद्ध व्यक्ती एका खासगी कंपनीत स्टोअर कीपरच्या नोकरीतून निवृत्त झाली असून, ती आपला भाऊ आणि पुतणीसोबत राहत आहे.