जम्मू काश्मीर येथील पुलवामा परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय वायूसेनेने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानाला चोख उत्तर दिले. यात 200 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 72 तास महत्त्वाचे आहेत असे सांगत दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन्ही देशातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेत सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यावर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. तसंच दहशतवादाविरोधी कारवाई करणारी पथकंही तैनात करण्यात आली आहेत. यामुळेच पंजाब, राजस्थान आणि गुजरात राज्यातील तीन शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. Surgical Strike 2: पाकिस्तानात वायुसेनेने केलेल्या हल्ल्याची ठिकाणे Google Map वरुन पाहा
तणावपूर्ण परिस्थिती दहशतवादी हल्ला झाल्यास त्यास कसे उत्तर द्यायचे यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. नंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. मात्र दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून काल पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करत हल्ला करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पाच शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.