खा. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारला कांदा दरवाढीचा जाब; अर्थमंत्री म्हणतात, 'मी कांदा लसून जास्त खात नाही' (Video)
सुप्रिया सुळे आणि nirmala सीतारमण (Photo Credit : ANI)

हिवाळी अधिवेशनाच्या 13 व्या दिवशी संसदेत पुन्हा एकदा कांद्यावर (Onion) चर्चा झाली. देशात कांद्याच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे व्हायची वेळ आली. कांद्याची महागाई आता सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी कांद्याच्या दरवाढ मुद्द्याला हात घालत, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना याबाबतचे कारण विचारले. त्यावर अर्थमंत्र्यांनी कांद्याच्या वाढत्या किंमतींचा त्यांच्यावर वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला नाही, कारण त्या फार कमी कांदा लसून खातात असे उत्तर दिले. सध्या सोशल मिडीयावर या गोष्टीचा व्हिडीओ फार व्हायरल होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपले मुद्दे उपस्थित करताना, ‘देशातील कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे आपण बाहेरून कांदा मागवत आहोत. कांदा उत्पादक शेतकरी हा फार मोठा शेतकरी नसतो, त्यामुळे त्याच्यावरही या गोष्टीचा परिणाम नक्कीच झाला आहे. तर असे का घडले?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अर्थमंत्र्यांनी ‘आपल्या कुटुंबात जास्त कांदा लसून खात नसल्याचे सांगितले’.

2019-20 या आर्थिक वर्षासाठी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या पहिल्या तुकडीवरील लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या,  ‘कांद्याच्या साठवणुकीशी संबंधित काही स्ट्रक्चरल मुद्दे आहेत आणि सरकार त्यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलत आहे. लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे आणि उत्पादनही घटले आहे परंतु सरकार उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी पाऊले उचलत आहे. (हेही वाचा: कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ (Watch Video))

कांद्याचा दर नियंत्रित करण्यासाठी मूल्य स्थिरता कोष वापरला जात आहे. या संदर्भात 57 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक केला आहे. याशिवाय इजिप्त आणि तुर्की येथूनही कांदा आयात केला जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अलवरसारख्या भागातून कांदा इतर राज्यांत पाठवला जात आहे.’