भारतातील सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाल्यापासून, प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे. मात्र केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिक मार्गांवर सुरू करत असल्याने या गाडीवर दगडफेकीच्या (Stone Pelting) घटनांमध्येही वाढ होत आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) मंगळवारी (28 मार्च 2023) इशारा दिला आहे. आता वंदे भारत गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
दक्षिण मध्य रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गाड्यांवर दगडफेक करणे हा गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तेलंगणातील विविध ठिकाणी वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना नुकत्याच समोर आल्यानंतर रेल्वेने हा इशारा दिला आहे. यावर्षी जानेवारीपासून अशा नऊ घटना समोर आल्या आहेत.
प्रसिद्धीपत्रकात दक्षिण मध्य रेल्वेने पुढे म्हटले आहे की, अलिकडच्या काळात वंदे भारत ट्रेनला अनेक समाजकंटकांनी लक्ष्य केले आहे. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल करून रेल्वे संरक्षण दलाने (RPF) आतापर्यंत 39 गुन्हेगारांना अटक केली आहे. दगडफेकीच्या काही घटनांमध्ये 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश होता. एससीआरने म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक पालक, शिक्षक आणि ज्येष्ठांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे आणि मुलांना अशा उपक्रमांपासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावे.
त्याचबरोबर रेल्वे अधिकारी आणि आरपीएफने जनतेला रेल्वे मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आणि दगडफेकीसारख्या समाजकंटक कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले. या वर्षी 3 जानेवारीला संध्याकाळी वंदे भारत एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीहून हावडा येथे परतत होती, त्यावेळी मालदा जिल्ह्यातील कुमारगंजजवळ अज्ञात व्यक्तींनी रेल्वेवर दगडफेक केली. दगडफेकीमुळे ट्रेनच्या सी-13 कोचच्या दरवाजाला तडा गेला आणि खिडकीला तडा गेला. (हेही वाचा: सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; लवकरच मिळू शकतील अडकलेले पैसे, Supreme Court ने अलॉट केले 5,000 कोटी रुपये)
यानंतर काही दिवसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेकीची घटना उघडकीस आली. त्यानंतर कृष्णराजपुरम-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांदरम्यान म्हैसूर आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 20608 वर दगडफेक झाली. या दगडफेकीत रेल्वेच्या दोन खिडक्यांचे नुकसान झाले. दक्षिण पश्चिम रेल्वे, बेंगळुरू विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रेल्वे संरक्षण दलाने जानेवारी 2023 मध्ये दगडफेकीच्या 21 आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात फेब्रुवारी 2023 मध्ये 13 प्रकरणे नोंदवली आहेत.