महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government GR) नुकत्याच काढलेल्या एका शासकीय ठराव अर्थातच जीआरमध्ये 'राष्ट्रभाषा हिंदी' (Rashtra Bhasha Hindi) असा उल्लेख आहे. या उल्लेखावरुन मराठी नागरिकांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने हा जीआर काल म्हणजेच सोमवारी (16 जानेवारी) जारी केला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या या शासन निर्णयामध्ये प्रस्तावनेची सुरुवातच 'राष्ट्रभाषा हिंदी' असा उल्लेख करत करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा केव्हापासून झाली? असा सवालच नेटीझन्सनी केला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने हा जीआर काढला आहे.
आतापर्यंत अनेकदा हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला गेला. परंतू, भारत सरकारने हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे कधीही अधिकृतरित्या म्हटले नाही. अर्थात हिंदी भाषेचा उपयोग औपचारीक पद्धतीने केला जातो. केंद्र सरकारच्या अनेक सूचना, निर्देश, आदेश, ठरवा हिंदी आणि इंग्रजी भाषेत निघतात. हिंदी भाषकांची संख्या तुलनेत काहीशी अधिक असल्याने अनेकांचा हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा समज झाला आहे. प्रत्यक्षात मात्र हिंदी राष्ट्रभाषा असल्याला कोणताही अधिकृत पुरावा अथवा तसा दस्तऐवज उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांच्या गैरसमजाव्यतिरीक्त त्याला कोणताच पूरावा नाही. त्यामुळे राज्य सरकारने वापरलेला हिंदी राष्ट्रभाषा असा उल्लेख वादाचे कारण ठरला आहे. (हेही वाचा, हिंदी राष्ट्रीय भाषा नाही उगाच ती आमच्या माथी लादू नका; मनसेचा इशारा)
राज्य सरकारच्या जीआरमध्ये 'राष्ट्रभाषा हिंदी' या उल्लेखाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिळ शिदोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरुन टॅग करत शिरोळे यांनी 'ह्या शासननिर्णयाच्या प्रस्तावनेतील पहिलंच वाक्य आहे “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे..” कधी जाहीर झाली हिंदी ही राष्ट्रभाषा? हिंदी ही इंग्रजीसोबतची शासनाची प्रशासकीय भाषा किंवा औपचारिक भाषा आहे असा आमचा समज आहे.. कृपया खुलासा करावा..', असे म्हटले आहे.
ट्विट
ह्या शासननिर्णयाच्या प्रस्तावनेतील पहिलंच वाक्य आहे “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे..” कधी जाहीर झाली हिंदी ही राष्ट्रभाषा? हिंदी ही इंग्रजीसोबतची शासनाची प्रशासकीय भाषा किंवा औपचारिक भाषा आहे असा आमचा समज आहे.. कृपया खुलासा करावा.. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/RiWiPVkb8A
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) January 16, 2023
मनसे नेते अनिल शिदोरे यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सोशल मीडियावरील इतरही अनेक नेटीझन्सनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. 'राष्ट्रभाषा हिंदी' हा उल्लेक नेमका कोणत्या संदर्भाने आणि कारणासाठी करण्यात आला? हिंदी ही राष्ट्रभाषा केव्हा झाली? त्याचा पूरावा काय? असे अनेक प्रश्न राज्य सरकारला विचारण्यात येत आहेत.