कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान अनेक लोक मुंबई, दिल्ली सारख्या शहरांत अडकून पडले आहेत. इच्छा असूनही या लोकांना त्यांच्या मूळ गावी परतणे शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये एअरलाईन कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) मदतीसाठी पुढे आली आहे. दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये अडकलेल्या बिहारमधील परप्रांतीय मजुरांना मदत करण्याची इच्छा स्पाइसजेटने व्यक्त केली आहे. सरकारने जर का परवानगी दिली तर, दिल्ली आणि मुंबईहून पाटणा येथे काही उड्डाणे करता येणार असल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे. याद्वारे शहरांत अडकलेले लोक त्यांच्या गावी परतू शकतील.
याबाबत बोलताना स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह शुक्रवारी म्हणाले की, ‘याआधीच लॉकडाऊन दरम्यान आम्ही सरकारला आमच्या सेवा देऊ केल्या आहेत. आता आमची विमानसेवा दिल्ली व मुंबईहून पाटणा येथे काही उड्डाणे चालविण्यास तयार आहे, जेणेकरून परप्रांतीय प्रवासी कामगार विशेषतः बिहार मधील लोक आपल्या घरी पोहचू शकतील. कोरोनो विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही आमचे सरकार आणि सहकाऱ्यांना जितकी शक्य होईल तितकी मदत करण्यात तयार आहे.’
अशाप्रकारे स्पाइसजेटने सरकारच्या या मानवतावादी अभियानासाठी आपली विमाने, सेवा आणि स्टाफ ऑफर केला आहे. याआधीच अन्नधान्य, औषधे आणि वैद्यकीय उपकरणासाठी कंपनी दररोज (मालवाहू विमाने) उड्डाणे करत आहे. आता सरकार जर परवानगी देत असेल तर, अडकलेल्या लोकांनाही घेऊन जाण्यासाठी स्पाइसजेटने मदत देऊ केली आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीय सेना तयार, 'ऑपरेशन नमस्ते' ची घोषणा)
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी, भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सध्या सर्व प्रकारच्या वाहन सेवा बंद करण्यात आल्या असून नागरिकांना आहे तिथेच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे आणि 700 पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.