Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

'एक भारत श्रेष्ठ भारत' (Ek Bharat Shreshtha Bharat) कार्यक्रमात भाग घेणाऱ्या तरुणांना भारतीय रेल्वे प्रवास भाड्यावर 50 टक्के सवलत (Railway Ticket Concession) देणार आहे. ही सूट केवळ द्वितीय/स्लीपर क्लासच्या मूलभूत भाड्यावर उपलब्ध असेल. 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करणारे असे तरुण ही सूट मिळण्यास पात्र ठरतील,  ज्यांचे एकूण मासिक उत्पन्न दरमहा 5,000 रुपयांपेक्षा जास्त नाही. प्रवासी भाड्यात सूट देण्याची तरतूद फक्त सामान्य गाड्यांसाठी आहे. विशेष गाड्या आणि विशेष कोचवर ही सूट लागू होणार नाही.

प्रवासाच्या प्रारंभापासून गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी 300 कि.मी.पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्यांना, परतीच्या प्रवासासाठी दुसर्‍या श्रेणी/स्लीपरच्या एका बाजूच्या  भाड्यात ही सूट देखील दिली जाईल. विविध राज्यांच्या संबंधित मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांकडून, रेल्वेच्या विहित नमुन्यात जारी केलेले प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच ही सूट दिली जाईल. इच्छुक सहभागींनी हे प्रमाणपत्र संबंधित रेल्वेच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडे, मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक आणि विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक इत्यादींकडे सादर करावे, जे नंतर रेल्वे भाड्यातून सूट देण्याचे आदेश जारी करतील.

(हेही वाचा: रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये 60 टक्क्यांपर्यंत वाढ; जाणून घ्या नवे दर)

या आदेशाच्या आधारे, संबंधित रेल्वे स्टेशन मास्टर भाडे सवलतीत परवानगी देईल. ज्या लोकांचा प्रवास खर्च केंद्र किंवा राज्य सरकार, स्थानिक वैधानिक संस्था, कॉर्पोरेशन्स किंवा सार्वजनिक उपक्रम आणि विद्यापीठे उचलत आहेत, अशा लोकांना लोकांना या सूटचा लाभ घेता येणार नाही. मात्र लक्षात घ्या, प्रवासी भाड्यातील ही सवलत केवळ मूळ भाड्यावरच लागू होईल. रेल्वेच्या तिकिटावरील अतिरिक्त शुल्क, आरक्षण शुल्क किंवा इतर शुल्कावर सूट देण्याची तरतूद नाही. सूट संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी संबंधित रेल्वे क्षेत्राच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकाशी संपर्क साधता येईल.