Image used for represenational purpose (File Photo)

मध्य प्रदेशच्या खंडवा शहरात (Khandwa) एका व्यक्तीने किरकोळ वादावरून, 'क्राइम पेट्रोल' (Crime Patrol) पाहून चक्क आपल्या आईची हत्या केली. इतकेच नाही तर मृतदेह पाच दिवस घरातच लपवून ठेवला. जेव्हा मृतदेहाची दुर्गंधी वाढली, तेव्हा त्याने मृतदेह एका पोत्यात भरला व शहरातील कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील रामनगरच्या साई मंदिराजवळील नाल्यात फेकून दिला. या भागात दुर्गंधी सुटल्यानंतर शुक्रवारी सकाळी स्थानिकांनी ते पाहिले आणि पोलिसांना कळविले.

खंडवाचे पोलिस अधीक्षक शिवदयाल सिंह यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. मुलगा संतोष पाटील (वय 32) याला शुक्रवारी रात्री, विमलाबाई यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

विमलाबाई शहरातील रामनगरच्या रहिवासी होत्या. पोत्यात असलेला अज्ञात महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी रामनगरमधील नाल्यात सापडला. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात त्या भागात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज शोधले, एका फुटेजमध्ये रात्री एक माणूस पोते घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी या भागातील परिसरातील लोकांकडे याबाबत चौकशी केली असता, ही व्यक्ती संतोष पाटील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने 17 फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या आईची हत्या केली. (हेही वाचा: आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या)

महत्वाचे म्हणजे, आरोपीच्या म्हणण्यानुसार, टेलीव्हिजनवर 'क्राइम पेट्रोल' सीरियल पाहिल्यानंतर, त्याने हे कृत्य करण्याचा कट रचला. गरीबीमुळे विमलाबाई आपल्या मुलाला चार पैसे कमवण्याबद्दल सतत सांगत होत्या. संतोषचे लग्न झाल्यावर तर त्याने काम करणे सोडूनच दिले होते. याच बाबतीत आई-वडील व संतोष यांमध्ये खटके उडत होते. याच रागातून संतोषने आई-वडील दोघांनाही मारण्याचा कट रचला व यासाठी तो गेले 1 महिने सतत' क्राइम पेट्रोल पाहत होता. त्यानंतर त्याने 17 फेब्रुवारीला आईची हत्या केली. त्यानंतर एक खुनी आपल्या घरात राहत हे पाहून वडील घरातून पळून गेले व त्यांचा जीव वाचला.