कर्नाटकची राजधानी, बेंगळुरू (Bengaluru) येथील वेकफिट (WakeFit) कंपनीने झोपेच्या बदल्यात 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासाठी निवडलेल्या व्यक्तीला 100 दिवस दररोज 9 तासांची झोप पूर्ण करावी लागेल. ऑनलाईन स्लीप सोल्यूशन कंपनी वेकफिटने ही ऑफर जाहीर केली आहे. Wakefit.co या कार्यक्रमाचे नाव 'वेकफिट स्लीप इंटर्नशिप' (WakeFit Sleep Internship) असे ठेवले आहे, जिथे निवडलेल्या उमेदवारांना 100 दिवस दररोज रात्री नऊ तास झोपावे लागते. 1 लाख रुपये देण्याशिवाय या ठिकाणी झोपेचे तज्ञ, फिटनेस तज्ञ मदत करतील तसेच झोपेची गुणवत्ता सुधारणारे व न्यूट्रिशनिस्ट देखील देण्यात येणार आहेत.
2019 पासून कंपनीने अशा इंटर्नशिपला सुरुवात केली होती. मागील वर्षी हा एक यशस्वी उपक्रम होता, कारण जवळपास 1.7 लाख लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता व त्यापैकी 23 इंटर्नची निवड करण्यात आली होती. आता कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर, 2021 साठीच्या इंटर्नशिपसाठी अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. निवडलेले उमेदवार कंपनीने दिलेल्या गाद्यांवर झोपतील व झोप कशी होती हे सांगतील. कंपनी झोपलेल्या उमेदवारांचे काउंसलिंग करेल आणि त्यांच्या गादीवर झोपण्याच्या पद्धतीचा मागोवा घेईल. या वेळी, झोपेचे तज्ञ देखील सल्ला देतील. शॉर्टलिस्टेड उमेदवारांची झोप व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली जाईल. (हेही वाचा: निवांत झोप लागावी म्हणून पुरुषांनी केली कुंभकर्णाची पूजा, भर रस्त्यात झाले निद्राधीन)
यामागील हेतू म्हणजे ‘झोपेच्या’ विषयीची मानसिकता बदलणे आणि झोप ही शरीरासाठी किती महत्वाची आहे, हे पटवून हा आहे. यामध्ये निवडले गेलेले इंटर्न वेकफिटच्या विशेष गाद्यावर 100 दिवस, 9 तासांसाठी झोपून त्यांचा अनुभव कथन करतील. यासाठी स्लीप ट्रॅकरही देण्यात येणार आहेत.