राजस्थानच्या कोटा येथील जेके लोन रुग्णालयात शंभराहून अधिक नवजात मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्येही अशीच घटना समोर आली होती. आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल येथील कुशाभाऊ ठाकरे जिल्हा रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे. या परिसरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात अवघ्या 12 तासांत सहा नवजात मुलांचा मृत्यू झाला आहे. सध्या, सर्व मुलांच्या मृत्यूचे कारण निमोनिया असल्याचे म्हटले जाते. या सहा मुलांपैकी दोन मुलांना वॉर्ड आणि चार मुलांना एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या मुलांचे वय सात दिवस ते चार महिने होते.
नवजात मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाने मौन बाळगले आहे. मात्र, न्यूमोनियामुळे सर्व मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोत येत आहे. त्यापैकी जैतपूर विकासखंडाच्या खरेला गावात राहणारी चौथ कुमारीचा मृत्यू 13 जानेवारी रोजी, सकाळी 10.50 वाजता निधन झाले. याबाबत सिव्हिल सर्जन व मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. (हेही वाचा: कोटा येथील हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात तब्बल 102 मुलांचा मृत्यू; विरोधी पक्षाने चढवला राज्य सरकारवर हल्ला)
विभागीय जिल्हा रुग्णालयात 12 तासांत अशा प्रकारे सहा मुलांच्या मृत्यूने संपूर्ण रुग्णालय प्रशासन व यंत्रणेला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधींबाबतही आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांनी या मुलांच्या मृत्यूच्या घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.तसेच. या प्रकरणांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.