केरळमधील (Kerala) पलक्कड (Palakkad) येथून दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी, तिचा प्रियकर रहमानसोबत त्याच्या घरात एका लहान खोलीत इतकी वर्षे राहत असल्याची घटना समोर आली आहे. स्वतः मुलाच्या आई-वडिलांनाही याची कल्पना नव्हती की आपल्या घरी कोणी राहत आहे. जेव्हा दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुलगी 18 आणि मुलगा 24 वर्षांचा होता. आज जेव्हा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले तेव्हा मुलगी 28 वर्षांची आहे आणि मुलगा 34 वर्षांचा आहे. विश्वास ठेवायला कठीण अशी ही घटना आहे. पोलिसांनी सांगितले की मुलगी फेब्रुवारी 2010 मध्ये मध्ये नेमारा पोलिस ठाणे अंतर्गत अयीरूर येथून बेपत्ता झाली होती.
पोलिसांनी सांगितले की मुलीचे घर तिच्या प्रियकराच्या घराजवळ होते व ती इतकी वर्षे मुलाच्या घरातील एका छोट्या खोलीत राहत होती. तब्बल 10 वर्षे कोणालाही न माहिती होता प्रियकर तिची देखभाल करीत होता. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलीला भेटण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती. मार्च 2021 पर्यंत ही मुलगी रेहमानच्या घरात राहिली. त्यानंतर रेहमान बेपत्ता झाल्यावर या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली गेली व त्यादरम्यान ही कहाणी समोर आली. मुलगीही तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. हे दोघेही दुसऱ्या गावात भाड्याच्या खोलीत राहू लागले होते मात्र आता त्यांना ताब्यात घेतले आहे.
10 वर्षे मुलगी आई-वडिलांच्या घराच्या अवघ्या 500 मीटरवर राहत होती मात्र याची त्यांना कल्पना नव्हती. ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी या दाम्पत्याला स्थानिक न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना एकत्र राहण्याची अनुमती मिळाली. नेनमारा पोलिस ठाण्याचे गृह अधिकारी दीपा कुमार यांनी सांगितले की, सजीता आणि रेहमान यांनी आपले संबंध लपवून ठेवले कारण, ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. समाज त्यांचे नाते मान्य करणार नाही अशी त्यांना भीती होती. (हेही वाचा: लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे इजिप्शियन व्यक्तीने गळा दाबून केली पत्नीची हत्या)
रेहमानचा भाऊ बशीर याने सांगितले की, आपल्या घरी कोणीतरी राहत आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. रहमान कोणालाही त्याच्या खोलीत प्रवेश करू देत नसे. तो हाऊस पेंटर असल्याने त्याच्याकडे वेगळी खोली होती. कधीकधी तो एखाद्या मानसिक रूग्णासारखा वागायचा, जर कोणी त्याच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो हिंसक व्हायचा. आपले जेवणही तो आपल्या खोलीतच घ्यायचा. इतकी वर्षे इअरफोन वापरुन छोट्या टीव्हीद्वारे ही मुलगी स्वतःचे मनोरंजन करत होती.