Sex For Job Offer: ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) मध्य प्रदेश राज्य बियाणे आणि शेती विकास महामंडळात नोकरी देण्यासाठी सुरू असलेल्या मुलाखत प्रक्रियेदरम्यान, उमेदवारांकडून शारीरिक संबंधांची मागणी (Sex For Job Offer) केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही बाब समोर आल्यानंतर महामंडळाने या प्रकरणाची दाखल घेत कडक कारवाई केली आहे. महामंडळाने आरोपी संजीव कुमार तंतुवे याची कंत्राटी सेवा समाप्त करण्याचा आदेश जारी केला आहे. ही सूचना जारी करताना, महामंडळाने सांगितले की, मध्य प्रदेश राज्य बियाणे आणि शेती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार तंतुवे, क्षेत्र उत्पादन अधिकारी, कॉर्पोरेशन मुख्यालय, भोपाळ, याची सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त केली जात आहे.
महामंडळाने जारी केलेल्या आदेशात तंतुवे याने केलेले हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आणि गैरव्यवहाराच्या श्रेणीत येते, असे म्हटले आहे. याशिवाय, ते कंत्राटी सेवा नियमांच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करण्याच्या श्रेणीत येते. कठोर कारवाई करत सरकारने तंतुवे याच्या सेवा तत्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत.
अहवालानुसार, बियाणे आणि शेती विकास महामंडळात नोकरी देण्यासाठी सुरू असलेल्या मुलाखत प्रक्रियेदरम्यान आरोपी संजीव कुमार तंतुवे याचा मुलाखत पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. मुलाखत प्रक्रियेनंतर त्याने तीन उमेदवारांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून शारीरिक संबंधांची मागणी केली होती. त्यानंतर पीडितेने आरोपी संजीव कुमार तंतुवे विरुद्ध ग्वाल्हेर क्राइम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या तपासात ही तक्रार खरी ठरली, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. (हेही वाचा: Odisha Shocker: ओडिशात एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल)
अटक केल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. बडतर्फीच्या आदेशानुसार, तक्रारीनंतर, अधिकाऱ्यावर ग्वाल्हेर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 13 जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 354-ए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता या अधिकाऱ्याची सेवा समाप्त करण्यात आली आहे.