SBI VRS Scheme 2020: एसबीआय 30,000 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती देण्याच्या तयारीत; जाणून घ्या व्हीआरएस प्लान, पात्रता व फायदे
SBI (Photo Credits: Facebook)

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ने 30,000 कर्मचाऱ्यांना वेळेआधी सेवानिवृत्ती (VRS) घेण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने व्हीआरएस योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये 30,190 कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. मार्च 2020 मध्ये बँकेचे एकूण 2.49 लाख कर्मचारी होते तर, मार्च 2019 मध्ये 2.57 लाख होते. सूत्रांच्या माहितीनुसार व्हीआरएस चा मसुदा बँकेने तयार केला असून, मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल. बँकेने या योजनेला 'सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस -2020' (Second Innings Tap VRS-2020) असे नाव दिले आहे. बँक म्हणते की, यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक चांगला फायदा होईल.

बँकेच्या म्हणण्यानुसार, या योजनेच्या माध्यमातून बँक 2000 कोटींपेक्षा जास्त बचत करेल. जर या योजनेंतर्गत जर का 30 टक्के लोकांनी व्हीआरएस घेतली, जुलै 2020 च्या पगाराच्या अंदाजानुसार बँक जवळपास 1,662.86 कोटी रुपयांची बचत करेल.

पात्रता –

व्हीआरएस योजनेच्या मसुद्यानुसार सुमारे 11,565 अधिकारी व 18,625 कर्मचारी या योजनेस पात्र ठरणार आहेत. जर बँक कर्मचार्‍यांना व्हीआरएस योजना घ्यायची असेल तर त्यासाठी काही पात्रता विहित करण्यात आल्या आहेत. बँकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार केवळ असेच कर्मचारी किंवा अधिकारी यासाठी पत्र असतील, ज्यांनी निश्चित तारखेपर्यंत बँकेत 25 वर्षे पूर्ण केली असतील किंवा ज्यांनी आपल्या वयाची 55 वर्षे पूर्ण केली असतील.

फायदे -

2020 डिसेंबर ते फेब्रुवारी 2021 पर्यंत बँक आपल्या कर्मचार्‍यांसाठी ही योजना लागू करेल. मसुद्यानुसार, व्हीआरएस योजना घेणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकरीच्या एकूण वर्षानुसार किंवा शेवटच्या पगाराच्या तुलनेत 18 महिन्यांचा पगार दिला जाईल. (हेही वाचा: SBI ATM Withdrawal Rules: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल)

तसेच ग्रॅच्युइटी, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय लाभ देण्यात येतील. या व्यतिरिक्त या योजनेत व्हीआरएस घेणारे कर्मचारी सेवानिवृत्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या निश्चित कालावधीनंतर पुन्हा बँकेच्या नोकरीत सामील होऊ शकतात.