Reliance Industries Retail मध्ये सौदी अरेबियाच्या Public Investment Fund ची 9,555 कोटींची गुंतवणूक; विकत घेतले 2.32 टक्के भागभांडवल
Reliance Industries (Photo Credits: ANI)

अब्जाधीश उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीने (PIF) 9,555 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पीआयएफ 2.04 टक्के भागभांडवल 9,555 कोटी रुपयांना खरेदी करेल. पीआयएफ हा सौदी अरेबियाचा सॉव्हेरन वेल्थ फंड आहे. यापूर्वी यांनी (सार्वजनिक गुंतवणूक निधी) जिओ प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केली आहे. पीआयएफने त्यातील 2.32 टक्के भागभांडवलसाठी 11367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्यात फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या रिटेल बिझिनेस कंपनीने काही महिन्यांत 47,265 कोटी रुपये जमवले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणतात की, ‘सौदी अरेबियाच्या राज्याशी आमचे (रिलायन्स) दीर्घ संबंध आहेत. त्याचबरोबर पीआयएफ सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला प्रगती देण्यास आघाडीवर आहे. रिलायन्स रिटेलमधील महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून मी पीआयएफचे स्वागत करतो. रिलायन्स रिटेलसह भारतीय रिटेल क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पीएएफचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल.’ भारतातील रिटेल क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे किरकोळ क्षेत्र आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) त्याचा 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.

रिलायन्सने 2006 मध्ये देशात संघटित रिटेल व्यवसायात प्रवेश केला होता. कंपनीने सर्वप्रथम हैदराबादमध्ये रिलायन्स फ्रेश स्टोअर सुरू केले होते. जवळच्या बाजारपेठेतून ग्राहकांना किराणा, भाजीपाला पुरवणे अशी कंपनीची कल्पना होती 25,000 कोटी रुपयांपासून कंपनीने ग्राहक टिकाऊ वस्तू, फार्मसी आणि जीवनशैली उत्पादने प्रदान करण्यास सुरवात केली. यानंतर कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि कॅश अँड कॅरी बिझिनेसमकडेही मोर्चा वळविला. (हेही वाचा: बॅंकांकडून व्याजमाफी योजनेला सुरूवात; आजपासून ग्राहकांना मिळणार कॅशबॅक)

रिलायन्स रिटेलचे लक्ष लाखो ग्राहक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSME) सबलीकरण करण्यावर आणि जागतिक व देशांतर्गत कंपन्यांशी प्राधान्यीकृत भागीदार म्हणून जवळून काम करून, भारतीय किरकोळ क्षेत्राचे पुनर्गठन करण्यावर आहे.