
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (Saraswat Co-operative Bank) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडशी (New India Co-operative Bank) स्वेच्छेने विलीनीकरणाचा प्रस्ताव जाहीर केला आहे. यामुळे न्यू इंडियाच्या 1.22 लाखांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर पूर्ण संरक्षण मिळेल. न्यू इंडिया बँकेला फेब्रुवारी 2025 मध्ये 122 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने निर्बंध लादले होते, ज्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्यासाठी 25,000 रुपये प्रति खाते मर्यादा लागू झाली होती. आता सारस्वत बँकेच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यासह बँकेच्या मालमत्तेचे आणि दायित्वांचे व्यवस्थापनही सारस्वत बँकेद्वारे केले जाईल.
सारस्वत बँक ही भारतातील एक मोठी शहरी सहकारी बँक आहे, तिने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेशी विलीनीकरणासाठी आरबीआयकडे स्वेच्छेने प्रस्ताव सादर केला आहे. या विलीनीकरणाला आरबीआयची तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, आता दोन्ही बँकांच्या भागधारकांची मंजुरी आणि आरबीआयची अंतिम मंजुरी बाकी आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ई. ठाकूर यांनी सांगितले की, हे विलीनीकरण ऑगस्ट-सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विलीनीकरणानंतर, न्यू इंडियाच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वे सारस्वतबँकेकडे हस्तांतरित होतील. न्यू इंडियाच्या ठेवीदारांना कोणताही आर्थिक तोटा (हेअरकट) सहन करावा लागणार नाही, आणि त्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढता येईल.
न्यू इंडियाच्या सध्या 2,397.85 कोटी रुपये ठेवी आणि 1,162.67 कोटी रुपये कर्जे आहेत, तर सारस्वत बँकेचा एकूण व्यवसाय 31 मार्च 2025 पर्यंत 91,814 कोटी रुपये होता, ज्यामध्ये 55,481 कोटी रुपये ठेवी आणि 36,333 कोटी रुपये कर्जांचा समावेश आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला फेब्रुवारी 2025 मध्ये 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. आरबीआयने बँकेच्या व्यवस्थापनात अनियमितता आणि खराब प्रशासन आढळल्याने तिचे संचालक मंडळ बरखास्त केले आणि श्रीकांत (माजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
बँकेची निव्वळ संपत्ती (नेट वर्थ) -102.74 कोटी रुपये इतकी नकारात्मक झाली आहे. यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्यासाठी 25,000 रुपये प्रति खाते मर्यादा लागू करण्यात आली होती. न्यू इंडियाकडे सध्या 27 शाखा आहेत, त्यापैकी 17 मुंबईत, 6 ठाणे आणि पालघरमध्ये, 2 सूरतमध्ये आणि प्रत्येकी 1 पुणे आणि नवी मुंबईत आहेत. या संकटामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती, परंतु सारस्वत बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा: RBI Lending Rate May 2025: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणामुळे कर्जदरात घट, कर्ज घेणे होणार अधिक स्वस्त)
सारस्वत बँकेने यापूर्वी सात आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सहकारी बँकांचे यशस्वीपणे विलीनीकरण केले आहे. या विलीनीकरणांमुळे 8 लाखांहून अधिक ठेवीदारांचे हित संरक्षित झाले आणि या बँकांचा एकूण व्यवसाय 1,900 कोटी रुपयांवरून 9,200 कोटी रुपयांपर्यंत वाढला. गौतम ठाकूर यांनी सांगितले की, ‘आम्ही यापूर्वी सात बँकांचे यशस्वी विलीनीकरण केले आहे, आणि न्यू इंडियाच्या ठेवीदारांना कोणताही तोटा होणार नाही.’ सारस्वत बँकेची एकूण शाखा संख्या 312 आहे, आणि या विलीनीकरणामुळे ती 27 शाखांनी वाढेल, विशेषतः मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात.