File image of Sanjay Jha (Photo Credits: Twitter/JhaSanjay)

राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कॉंग्रेस  (Congress) पक्षाचे दोन महत्वाचे नेते, अशोक गहलोत (Ashok Gehlot) व सचिन पायलट (Sachin Pilot) एकमेकांसमोर ठाकले आहेत. सचिन पायलट 30 आमदारांचे पाठबळ घेऊन दिल्लीत हजर झाले आहेत. त्यानंतर राजकारणातील अनेक नेत्यांनी सचिन पायलट यांना समर्थन दिले. अशात श्री संजय झा (Sanjay Jha) यांना पक्षविरोधी भूमिका आणि पक्षामधील शिस्तीचा भंग केल्याबद्दल तातडीने कॉंग्रेस पक्षाकडून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने (Maharashtra Congress) याबाबत माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या सहीचे निलंबनाचे पत्र महाराष्ट्र कॉंग्रेसने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेस ट्वीट -

सध्या राजस्थानमध्ये चालू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये संजय झा यांनी एक ट्वीट करत पक्षाला काही सल्ले दिले होते. यामध्ये ते म्हणतात, ’राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे. कॉंग्रेस कमकुवत असल्याने, तीन वेळा मुख्यमंत्री असलेले अशोक गहलोत यांना मोठी जबाबदारी देऊन, त्यांना पक्षाला बळकटी देण्यास सांगितले पाहिजे.’ पुढे कॉंग्रेस नेते संजय झा म्हणतात. ‘राजस्थानात कॉंग्रेसने नवीन अध्यक्ष दिला पाहिजे.’ कदाचित संजय झा यांचे हेच सल्ले पार्टीला झोंबले असतील. (हेही वाचा: सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले- रणदीप सिंह सुरजेवाला यांची घोषणा)

अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील सरकारविरोधात बंडखोरीनंतर, सचिनने पायलट यांना आज राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकले आहे. त्यानंतर संध्याकाळी संजय झा यांना पक्षातून निलंबित केले. गेल्याच महिन्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झा यांना पक्षाचे प्रवक्ते म्हणून काढून टाकले होते. झा यांनी एका वृत्तपत्राचा पक्षविरोधी लेख लिहिला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे संजय झा यांना निलंबित करून कॉंग्रेस पक्षाने एक स्पष्ट संदेश दिला आहे की, जो सचिन पायलट यांना पाठिंबा देईल त्याला पक्षामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.