सरकारी जन औषधी केंद्रांमध्ये 'सुविधा' सॅनिटरी पॅड केवळ एक रुपयात
Representative Image (Photo Credits: PixaBay)

महिलांना तसेच मुलींना मासिक पाळीत वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) आजपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून केवळ 1 रुपयात उपलब्ध होणार आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये हे सॅनिटरी पॅड उपलब्ध होतील अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हितावह असा हा निर्णय असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये हे पॅड्स आधी अडीच रुपयांना प्रत्येकी एक अशा किंमतीत मिळत होते. ते आता केवळ 1 रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे आधी 4 रुपयांना मिळणारे पॅडचे पाकिट आता केवळ 4 रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा- पुणेकर महिलांची 'पगार पे पॅड' चळवळ, घरकामासाठी येणाऱ्या महिलेला देणार मोफत सॅनिटरी पॅड

देशभरातील 5500 जन औषधी केंद्रांमध्ये 'सुविधा' या नावाने हे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतील, असे मांडवीय म्हणाले. तसेच सॅनिटरी पॅड्स बाबतीतील हा निर्णय मोदी सरकारच्या काळातील महत्वपुर्ण निर्णय असल्याचेही ते म्हणाले.

महिलांना दर महिन्याला येणा-या मासिक पाळीमध्ये पूर्वीच्या काळी महिला कपडा वापरायच्या. हे त्यांच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक होते. म्हणून सॅनिटरी पॅड्स ही नवीन संकल्पना राबविण्यात आली. मात्र याची किंमत ही गोरगरीबांना परवडण्यासाठी नसल्यामुळे अनेक महिला किंवा मुली आजही कपडा वापरतात. त्यामुळे सामाजिकतेचे भान ठेवून महिलांसाठी काय फायद्याचे आहेत हे लक्षात घेऊन हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.