इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा मुलगा रोहन मूर्ती (Rohan Murthy) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रोहन अपर्णा कृष्णन (Aparna Krishnan) नावाच्या मुलीशी लग्न करणार आहे. अपर्णाच्या आईचे नाव सावित्री कृष्णन असून, त्या एसबीआय बँक सेवानिवृत्त अधिकारी आहेत. तसेच अपर्णाचे वडील के.आर. कृष्णन हे माजी नौदल अधिकारी आहेत. रोहन आणि अपर्णा यांची तीन वर्षांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून मुंबईत भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे लग्न 2 डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांचा समावेश असेल. त्यानंतर फक्त मूर्ती कुटुंबातील सदस्यांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले आहे.
अपर्णाविषयी बोलायचे तर, तिने आपले शिक्षण भारत आणि परदेशातून पूर्ण केले आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेज कॅनडा इथून तिने आपले दहावीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तिने अर्थशास्त्र विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स चा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अपर्णाने मॅककिन्से आणि सेक्वाइया कॅपिटल (McKinsey and Sequoia Capital) सारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे. अपर्णा सध्या बंगळुरूमध्ये राहत आहे. तिच्या बहिणीचे लग्न अमेरिकेतील व्हॉर्टन स्कूलमधील तंत्रज्ञानाचे प्रोफेसर कार्तिक होसनगरशी झाले आहे.
दुसरीकडे रोहनने हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून, तिथून त्याने पीएचडी केली आहे. या विद्यापीठात तो सोसायटी ऑफ फेलोज मधील ज्युनियर फेलो आहे. विद्यापीठातर्फे हा सन्मान मिळालेला ‘संगणक विज्ञान शास्त्रज्ञ’ असा तो दुसरा आहे. यापूर्वी हा पुरस्कार विद्यापीठाने मारव्हिन मिन्स्की यांना दिला होता. मारव्हिन मिन्स्की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, रोहनच्या पांढऱ्या जागेच्या म्हणजेच स्पेक्ट्रमच्या वापराविषयी पीएचडी प्रबंधाने, एक नवीन मार्ग निर्माण केला आहे.