
Richest and Poorest Chief Minister In India: अवघ्या काही तासांत 2024 वर्ष संपेल. अशात 2024 च्या अखेरीस देशातील सर्वात श्रीमंत ते सर्वात गरीब अशा मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने विश्लेषणानंतर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वृत्तानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) 931 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (332.57 कोटी) आणि कर्नाटकचे सिद्धरामय्या (51.94 कोटी) यांचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी फक्त 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.
माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हेदेखील 2019 ते 2024 या कालावधीत, 510 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले होते. त्याआधी जगन यांच्या आधी नायडू यांनी 2014 ते 2019 दरम्यान सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून 177 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
सरासरी उत्पन्न-
एडीआरने आपल्या अहवालात प्रति मुख्यमंत्री सरासरी मालमत्ता 52.59 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. 2023-2024 मध्ये भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सुमारे 1,85,854 रुपये होते, तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न 13,64,310 रुपये आहे, जे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या 7.3 पट आहे. एडीआरच्या आकडेवारीनुसार देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे. (हेही वाचा: Mumbai Fraud Case: केवळ 13,000 रुपये पगारावर, गर्लफ्रेंडला आलीशान कार आणि फ्लॅट गिफ्ट; क्रीडा संकुलास 21 कोटी रुपयांचा गंडा)
सर्वात गरीब मुख्यमंत्री-
ममता यांच्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे 55 लाख रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत, तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन 1.18 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत. देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त दोनच महिला आहेत-पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी.
अहवालानुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एकूण संपत्ती 9 कोटी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची एकूण संपत्ती 8 कोटी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची संपत्ती 8 कोटींहून अधिक आहे. एडीआरच्या अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती 13.27 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर 62 लाखांचे दायित्वही आहे. सिद्धरामय्या यांच्यावर 23 कोटी आणि नायडू यांच्यावर 10 कोटींहून अधिकचे दायित्व असल्याचे अहवालात म्हटले आहे.