CMAshok Gehlot, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Ashok Gehlot On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान राज्यात बोलताना 'लाल डायरी' (Red Diary Case) बद्दल असलेले गूढ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करेल, असा घणाघात केला. त्यावर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत लाल डायरीपेक्षा 'लाल टोमॅटो'वर बोला, असे आव्हान दिले. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात सध्या 'लाल डायरी' विरुद्ध 'लाल टोमॅटो' असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवरील हल्ला कायम ठेवताना म्हटले की, त्यांना काल्पनीक असलेली लाल डायरी दिसू शकते. मात्र, दुर्दैव असे की, कोट्यवधी लोकांच्या रोजीरोटीचा विषय असलेले आणि गगनाला भिडलेले टोमॅटोचे भाव मात्र दिसत नाही. गॅसचे भाव भडकल्याने गृहिणींच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होताना दिसत नाही.

राजस्थान राज्यातील सीकर येथे आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आज (27 जुलै) काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या 'मोहोब्बत की दुकान' या संकल्पनेची "लुट की दुकान, झुट की दुकान' असे म्हणत खिल्ली उडवली. लाल डायरीत असे काय आहे जे लपवले जात आहे? असा सवाल विचारतानाच ही डायरीच काँग्रेसचा नाश करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांनी राजस्थानमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणावरुनही जोरदार टीका केली. राजस्थानमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक जोरदार कामाला लागले आहेत. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरच्या विषयावरुन सरकारची कोंडी केली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला यश येताना दिसत नाही. अशातच विरोधकांनी केंद्र सरकारवर अविश्वास आणण्याची तयारी केली असून लोकसभा सभापतींनीही त्याला मान्यता दिली आहे. अशा स्थिती पंतप्रधान आणि भाजप देशभरामध्ये विविध कार्यक्रम हाती घेऊन देशातील जनतेचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थानमध्येही पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.