बलात्कार, POCSO प्रकरणातील याचिका दोन महिन्यांत निकाली काढा; देशभरातील मुख्यमंत्री, उच्च न्यायायलांना कायदामंत्री रविशंकर प्रसाद लिहिणार पत्र
Shankar Prasad | (Photo Credit: Facebook)

बलात्कार (Rape) आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल असलेल्या प्रकरणांची सुनावणी दोन महिन्यांत निकाली काढावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे मत केंद्रीय कायदामंत्री (Law Minister) रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी रविवारी (8 नोव्हेंबर 2019) व्यक्त केले. या प्रकरणांच्या सुनावनीसंदर्भात एक पत्रही आपण देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांना लिहिणार असल्याचे रविशंकर प्रसाद (Law Minister Ravi Shankar Prasad) यांनी म्हटले आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, अशा प्रकारची प्रकरणांतील न्यायालयीन सुनावणी साधारण सहा महिन्यांमध्ये पूर्ण व्हावी. हैदराबाद आणि उन्नाव येथे घडलेल्या घटनांना डोळ्यासमोर ठेवत प्रसाद यांनी ही टीप्पणी केली आहे.

नवी दिल्ली येथील एका आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, महीलांसोबत होणारी हिंसा आणि बलात्कार या घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्या दोषींवर तातडीने कारवाई व्हावी. तसेच, त्यांच्यावर चालवले जाणारे घटले हे तातडीने निकाली निघावेत.

पुढे बोलताना केंद्रीय कायदामंत्री म्हणाले की, या प्रकरणात मी सर्व मंत्र्यांना आणि सर्वोच्च न्यायालयांनाही पत्र लिहिणार आहे. या पत्रात मी विनंती करणार आहे की, बलात्काराच्या घटना आणि पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेऊन ही प्रकरणं दोन महिन्यांत निकाली काढावीत. (हेही वाचा, 'बलात्कार, नक्षलवाद, दहशतवाद, ही नेहरू घराण्याची देण' साध्वी प्राची यांचे धक्कादायक विधान)

दरम्यान, देशातील बलात्काराच्या घटनांवर काँग्रस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, मला काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी याच्याबाबत कोणतेही मत व्यक्त करायचे नाही. देशभरात घडणाऱ्या विविध घटनांबाबत राहुल गांधी नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, टीका करतात. ज्याचा भारताच्या प्रतिमेवह वाईट परिणाम होतो. त्यांनी केवळ इतकेच ध्यानात घ्यायला हवे की ते एका राष्ट्रीय पक्षाचे मोठे नेते आहेत.