यंदा देशात सोमवार, 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) सण साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विशेष बंधनाचे प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर धागा बांधते. आता जसजसे रक्षाबंधन जवळ येत आहे, तसतसे देशातील अनेक शहरे राख्यांच्या अप्रतिम सजावटीने उजळून निघाली आहेत. यात सुरतमध्ये (Surat) विशेष राख्या दिसून आल्या. या वर्षी, शहरात हिरे, सोने आणि चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तूंनी बनवलेल्या राख्यांचा एक शानदार ट्रेंड पाहायला मिळत आहे.
नाजूक चांदीच्या धाग्यांपासून ते किचकट सोन्याचे डिझाईन्स, चमचमत्या डायमंड स्टडपर्यंत, सुरतचे ज्वेलर्स राख्या तयार करत आहेत. क्लासिक, शोभिवंत डिझाईन, आधुनिक, ट्रेंडी अशा सर्व प्रकारच्या राख्या सुरतच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
एएनआयशी बोलताना सुरतमधील एका ज्वेलरी शॉपचे मालक दीपक चोक्सी म्हणाले की, दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतो 500 रुपयांपासून ते 8000 रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या राख्यांसाठी अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. भावात घसरण झाल्यामुळे सोन्याच्या राख्या 4000 ते 80,000 रुपयांपर्यंत आहेत. हिऱ्यांच्या राख्यांची किंमत 35,000 रुपयांपासून सुरू होते. यावर्षी कलेक्शनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (हेही वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन कधी आहे? भद्रकालात राखी कधी बांधायची, जाणून घ्या, रक्षाबंधनाच्या मुहुर्ताविषयी संपूर्ण माहिती)
ते पुढे म्हणाले, या राख्या ग्राहकांच्या गरजेनुसार ब्रेसलेटच्या स्वरूपात तयार केल्या जातात. अनेक ग्राहकांनी प्लॅटिनम राख्याही मागवल्या आहेत. यंदाच्या किंमतीतील कपातीबद्दल बोलताना चोक्सी म्हणाले की, यंदा राख्यांच्या किमती किमान 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे हिरे आणि चांदीची विक्री कमी झाली आहे. या वर्षी हिरे आणि चांदीच्या किमतीही 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांनी यावर्षी हिरे आणि चांदीच्या राख्यांच्या अधिक ऑर्डर दिली आहे.