![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/poison.jpg?width=380&height=214)
Uttar Pradesh Crime News: भारती क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यास 2022 मध्ये झालेल्या कार अपघातातून (Accident) वाचविणाऱ्या 25 वर्षीय तरुण रजत कुमार (Rajat Kumar Suicide Attempt) याने आपल्या प्रेयसीसोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरनगर येथील (Muzaffarnagar News) बुच्चा बस्ती परिसरात घडली. रजत याचे मनू कश्यप नावाच्या मुलीसोबत कथीतरित्या प्रेमसंबंध होते. मात्र, दोघेही भीन्न जातसमूहातून येत असल्याने या प्रेमसंबंधास दोघांच्याही कुटुंबीयांकडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर रजत याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबाच्या विरोधामुळे दुःखद घटना घडली
रजत कुमार आणि मनू कश्यप हे दोघे अनुक्रमे 25 आणि 21 वर्षे वयाचे आहेत. दोघेही पाठिमागील काही दिवसांपासून परस्परांच्या प्रेमात होते. त्यातून त्यांनी आयुष्य सोबत घालविण्याच्या आणाभाका घेतल्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. मात्र, दोघांच्याही संभाव्य लग्नास दोन्हीकडील कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होता. त्यामुळे अत्यंत निराश झालेल्या या दोघांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच विषप्राशन केले. ज्यामध्ये मनू कश्यप हिचा मृत्यू झाला तर रजत हा गंभीररित्या अत्यावस्त झाला. त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, त्याची प्रकृती अतिषय चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, रजत याने त्यांच्या मुलीला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल. तिने त्याच्यावर अपहरणाचाही आरोप केला आहे.
रजत कुमार: ऋषभ पंत यास वाचवणारा माणूस
भारतीय क्रिकेटपटू आणि त्या काळातील संघाचा आघाडीचा चेहरा ऋषभ पंत याच्या वाहनास डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. रुरकीजवळ झालेल्या हा अपघात अत्यंत भयानक होता. तो दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना पंतची मर्सिडीज गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर क्षणार्धातच वाहनाने पेट घेतला आणि आग भडलकली. या घटनेत दोन तरुणांनी मोठे धाडस दाखवले. ज्यामध्ये रजत कुमार आणि निशू कुमार यांचा समावेश होता. हे दोघेही जवळच्याच कारखाण्यात काम करत होते. त्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेतली आणि पंतला जळत्या गाडीतून बाहेर काढले, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. त्यांच्या जलद कृती आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले आणि त्यांच्या मदतीची दखल घेत ऋषभ पंतने नंतर त्यांना दोन स्कूटर भेट दिल्या.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून आत्महत्येच्या या प्रकरणात झालेल्या अपहरण आणि विषबाधा अशा दोन्ही दृष्टीकोणातून तपास करण्यास सुरुवात केली आहे. तरुणीच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. तर, रजत कुमार रुग्णालयात जीवनमरणाची लढाई लढत आहे.