Rajasthan: भरतपुर येथील महिलेला गेले 5 महिने कोरोना विषाणूचा संसर्ग; तब्बल 31 चाचण्या सकारात्मक आल्याने डॉक्टरही बुचकळ्यात
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

गेले एक वर्ष भारत कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. कोरोनाचा संसर्ग कोणाला, कधी होईल काही सांगता येत नाही. यासाठी फक्त काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे. मात्र जरी संसर्ग झालाच तरी घाबरण्याचेही कारण नाही. दिवसेंदिवस भारताच्या रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा होत आहे. मात्र राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) शहरातील ‘अपना घर’ आश्रमात दाखल झालेल्या शारदा देवी ही महिला गेल्या 5 महिन्यांपासून कोरोना विषाणूची लढाई लढत आहे. 4 सप्टेंबर रोजी शारदा देवी यांचा कोरोना अहवालात सकारात्मक आला होता. अजूनपर्यंत या महिलेची संसर्गापासून मुक्तता झाली नाही.

शारदा देवी यांच्या गेल्या पाच महिन्यांत 31 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्या सर्व सकारात्मक आल्या आहेत. यामध्ये 17 आरटी-पीसीआर आणि 14 रॅपीड एंटीजन टेस्ट समाविष्ट आहेत. या महिलेला अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे दिली गेली आहेत मात्र तरी तिची कोरोना संसर्गामधून मुक्तता झाली नाही. याबाबत डॉ. बीएम भारद्वाज म्हणाले की, सतत पाच महिने कोरोना पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आता डॉक्टरही याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत. या महिलेला अजून चांगले उपचार मिळवेल म्हणून जयपूरला पाठविण्याची तयारी सुरू आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा अहवाल सातत्याने सकारात्मक असूनही शारदा देवी निरोगी आहेत. दिवसभर त्या स्वतःची कामे स्वतः करतात. या काळात त्यांचे वजन देखील 8 किलोने वाढले आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रदीप कुमार म्हणतात, ‘शारदा देवी कोरोना पॉझिटिव्ह असूनही इतरांना त्यांचा धोका नाही. त्यांच्या शरीरात उपस्थित कोरोना व्हायरस सक्रिय नाही, म्हणजेच आता त्या इतरांना संसर्ग पसरवणार नाहीत. मात्र खबरदारी म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे.' (हेही वाचा: Bharat Biotech's Nasal Vaccine: भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला तज्ञ समितीची मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंजुरी)

दरम्यान, डॉ. प्रदीप कुमार यांच्या मते, ' सातत्याने कोरोना अहवालात सकारात्मक येण्याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे रुग्णाच्या म्यूकोजामध्ये डेड व्हायरस साठलेला असावा आणि दुसरे म्हणजे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असावी.