Rajasthan: दौसा येथे एका घरातील 4 महिलांवर एकाच व्यक्तीचा बलात्कार; आरोपीवर तीन दिवसांत चार गुन्हे दाखल
Rape | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

याआधी आपण देशात बलात्काराच्या (Rape) बर्‍याच बातम्या ऐकल्या असतील, आता राजस्थानच्या (Rajasthan) दौसाहून (Dausa) अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दौसामध्ये एक-दोन नव्हे तर बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे चार बलात्कार पीडिता वेगवेगळ्या घरातले नसून एकाच घरातील आहेत. आरोपीने एकाच घरावर वासनेचा दरोडा टाकला आणि एकामागून एक चार महिलांवर बलात्कार केला. एकाच व्यक्तीवर या घृणास्पद घटनेचा आरोप आहे. त्याच्यावर अवघ्या तीन दिवसांत चार गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू गुर्जर हा पोलिस स्टेशन परिसरात ढाबा चालवतो. याच ढाब्यावर या महिला काम करत होत्या. गेल्या 1 वर्षापासून विष्णू गुर्जर एका महिलेवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु जेव्हा या महिलेला समजले की, आरोपीची नजर तिच्या धाकट्या बहिणी आणि मुलीवरही पडली आहे, त्यानंतर तिने दौसा महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर तिच्या दोन लहान बहिणी आणि मुलीनेही आपला दडपलेला आवाज उघडला आणि बलात्काराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. (हेही वाचा: Latur: धक्कादायक! लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; पीडितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या)

पोलिस सूत्रांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी महिलेने आरोपी विष्णू गुर्जर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी महिलेच्या अल्पवयीन बहिणीनेही आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 23 जानेवारी रोजी महिलेच्या दुसऱ्या बहिणीने आरोपी विष्णू गुर्जरविरोधात पुन्हा महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. 25 जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी या महिलेच्या मुलीनेही आरोपी विष्णू गुर्जर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिस चौकशी दरम्यान पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना एकमेकींना गुर्जरच्या कृत्याबाबत माहिती नव्हती. जेव्हा पहिल्या महिलेने गुन्हा दाखल केला तेव्हा सर्वांना कळले व इतर पिडीत महिलांनाही गुन्हा दाखल केला.