Indian Railways | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय रेल्वेने प्रवाशांना सुकर प्रवास करता यावा म्हणून काही महत्त्वाचे बदल 1 जुलै पासून केले जाणार आहेत. रेल्वेने तिकीट दर वाढवण्यासोबतच तात्काळ तिकीट बुकिंग मध्ये काही बदल केले आहेत. सुकर प्रवासाच्या अनुषंगाने, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार (1 जुलै) सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त एक नवीन सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, RailOne लाँच केले, जे भारतीय रेल्वेसाठी महत्त्वाच्या माहिती प्रणालींची रचना, विकास, अंमलबजावणी आणि देखभाल करते.

नव्याने लाँच केलेल्या या अॅप्लिकेशनद्वारे यूजर्सना सर्व प्रकारची तिकिटे बुक करता येतात, चौकशी करता येते, प्रवासाचे नियोजन करता येते आणि ट्रेनमधील अन्न आणि रेलमदत सारख्या सेवांचा लाभ घेता येतो . अ‍ॅप मुळे आता हे सारे एकाच ठिकाणी मिळणार आहे. RailOne app अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे आणि ते गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते. CRIS च्या मते, अ‍ॅपमध्ये मालवाहतूक रेल्वे सेवा चौकशीशी संबंधित फीचर्स देखील समाविष्ट आहेत.

"हे केवळ सर्व सेवा एकाच ठिकाणी एकत्रित करत नाही तर यूजर्सना भारतीय रेल्वेचा व्यापक अनुभव देण्यासाठी त्यांना एकत्रित करते," असे CRIS ने म्हटले आहे. RailOne मध्ये एकच साइन-ऑन सुविधा देखील आहे, ज्यामुळे यूजर्सवरील अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याचा भार कमी होतो.

Rail Connect किंवा UTS तुम्ही वापरत असाल तर?

जे यूजर्स आधीच RailConnect किंवा UTSonMobile अॅप्लिकेशन वापरत आहेत त्यांना नवीन क्रेडेन्शियल्स तयार करण्याची आवश्यकता नाही. ते त्यांचे यूजरनेम आणि पासवर्ड वापरून RailOne मध्ये लॉग इन करू शकतात. कार्यक्रमादरम्यान, मंत्र्यांनी नमूद केले की UTSonMobile अॅपला यूजर्स कडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि RailOne अधिक व्यापक आणि user-friendly experience देण्याचा प्रयत्न करत आहे.