Rahul Gandhi यांचे आव्हान, म्हणाले- 'मलाही अटक करा'; PM Narendra Modi यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्टरबाबत राजकीय वाद
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणू लस (Coronavirus Vaccine) परदेशात पाठविण्याबाबत प्रश्न उपस्थित केलेल्या पोस्टरवरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उघडपणे सरकारला आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करणार्‍या पोस्टरमुळे शनिवारी दिल्लीत 17 एफआयआर नोंदवून 15 जणांना अटक करण्यात आली होती. तेच पोस्टर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शेअर केले आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मलाही अटक करा.’ एवढेच नाही तर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर आपले प्रोफाइल पिक्चर बदलून त्याजागी हे पोस्टर लावले आहे.

काल, दिल्ली पोलिसांनी अशी पोस्टर लावणाऱ्या 15 जणांना अटक केली, ज्यात लिहिले होते की, ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली गेली?’ या पोस्टर्सबाबत गुरुवारी पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क केले गेले. त्यानंतर मिळालेल्या तक्रारींच्या आधारे अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी आदेशांचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्ता अधिनियम प्रतिबंधक कलमांतर्गत 15 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दिल्लीतील शाहदरा, रोहिणी, रिठाला, द्वारका आणि इतर अनेक ठिकाणी ही पोस्टर्स आढळली होती. 13 मे पर्यंत सर्व पोस्टर्स काढली गेली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणाच्या विनंतीवरून हे पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते याची तपासणी केली जात आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. आता राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचे समर्थनही अशी पोस्टरबाजी करणाऱ्या लोकांना मिळाले आहे. त्यांनीही असे पोस्टर शेअर करत आम्हालाही अटक करा अशी मागणी केली आहे. (हेही वाचा: Sputnik V लसीनंतर भारतात लवकरच दाखल होणार Sputnik Lite; जाणून घ्या सिंगल डोस कोविड-19 लसीची खासियत)

दरम्यान, देशाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. लॉकडाउन 1 आठवड्यानी वाढवून तो, 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील.