
पंजाबमधील (Punjab) होशियारपूर (Hosiyarpur) येथे झालेल्या टोळीयुद्धाच्या प्रकरणात दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जालंधर रोडवरील पिपलानवाला येथे ही घटना घडली, जिथे पुर्व वैमनस्यातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि गोळीबार (Firing) झाला.चन्ना आणि साजन यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पिपळणवाला येथे बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यांच्यातील मतभेद मिटण्याऐवजी चिघळले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हाणामारी आणि गोळीबार केला.
साजन यांच्या नेतृत्वाखालील गट महामार्गाच्या मध्यभागी वर्दळीच्या बाजारपेठेत उभा होता, तर चन्ना यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट घटनास्थळी आला आणि त्यांनी गोळीबार केला. मारामारीदरम्यान साजनच्या डोक्यात गोळी लागली, तर चन्ना गंभीर जखमी झाला. साजनचा मृत्यू झाला आणि चन्नाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण नंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पहायला मिळाले असून पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असून पुढील तपास देखील त्यांनी सुरु केला आहे.