Pro-Khalistan Slogans | (Photo Credit - ANI/Twitter)

पंजाब (Punjab) पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. सातत्याने होणाऱ्या हत्या आणि निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न कायम असतानाच आता पुन्हा एकदा खलिस्तान समर्थकांचे (Pro-Khalistan) आव्हान वाढू लागले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आप सरकारसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. त्यासोबत केंद्र सरकारचीही कसोटी लागणार आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर (Golden Temple in Amritsar) प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. हे समर्थक हातात नंग्या तलवारी घेऊन जमले. त्यांनी खसिस्तानी फुटीरतावादी जर्नेल भिंद्रनवाले (Jarnail Bhindranwale) यांचे पोस्टर्सही झळकवावले. त्यामुळे पंजाबमध्ये नेमके चाललेय तरी काय असा सवाल निर्माण झाला आहे.

पंजाबमध्ये 38 वर्षांपूर्वी खलिस्तानवाद्यांनी जोरदार कारवाया सुरु केल्या होत्या. या कारवायांना भिक न घालता तत्काली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबवले. खलिस्तानवाद्यांविरोधात सुरु केलेले ऑपरेशन ब्लू स्टार आजच्याच दिवशी म्हणजेच 6 जून 1984 रोजी थांबविण्यात आले. खलिस्तानी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा मृतदेह सापडल्यानंतर हे ऑपरेशन थांबविण्यात आले होते. या कारवाईत भारतीय लष्काराचे 83 जवान शहीद झाले तर 499 नागरिकांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा, खालिस्तान समर्थनार्थ ट्विट प्रोमट केल्याचा आरोप, मुंबई उच्च न्यायालयात ट्विटर विरुद्ध जनहित याचिका दाखल)

ऑपरेशन ब्लू स्टार वर्धापनदिनाचे औचित्य साधत अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर लोक मोठ्या प्रमाणावर जमले. त्यातील काहींनी तलवारी अचानक बाहेर काढल्या आणि खलिस्तानसमर्थनार्थ घोषणाबाजी सुरु केली. याच वेळी त्यांनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे पोस्टर्सही झळकावले. या लोकांपैकी काहींनी सूवर्ण मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. सुरक्षारक्षकांनी त्यांना तत्काळ अडवले.

ट्विट

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ च्या वर्धापन दिनापूर्वी (रविवारी, 5 जून) सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली आणि अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चाही केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या बैठकितील तपशील मात्र मान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला नाही. या सर्व घडामोडींनंतर पंजाबमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.