
पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवान दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत आहे. तसेच काश्मिरच्या घाटी परिसरात जैश संघटनेच्या दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरु आहे. तसेच जवानांना काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश मिळाले आहे. त्याचसोबत आता जैश संघटनेचा कमांडर मुद्दसिर खान (Mudasir Khan) ह्याचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुद्दसिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षणाच्या जवानांनी काश्मिर मधील पुलवामा जिह्यातील तरल येथील पिंगलिश ठिकाणी घेराव घातला आणि शोधमोहिम सुरु केली होती. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून देण्यात आली होती.
शोधमोहिम सुरु केल्यानंतर दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरु करण्यात आला. मात्र जवानांनी प्रतिउत्तर देत जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचसोबत या दहशतवाद्यांचे मृतदेह सुद्धा हस्तगत केले आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्रास्रे मिळाल्याने ती जप्त करण्यात आली आहेत. तसेच तरल या भागात अद्याप शोधमोहिम सुरु आहे. स्थानिक नागरिकांना गोळीबार होत असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्यास सांगितले आहे.(हेही वाचा-जम्मू काश्मिर येथे जवानांची मोठी कामगिरी: गोळीबारात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु)
गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी विस्फोटासह अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच 14 फेब्रुवारी पुलवामा भ्याड हल्ल्यात सीआरपीफचे 40 जवान शहीद झाले होते.