fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

आर्थिक वर्ष 2020-21 ची पहिली तिमाही म्हणजेच एप्रिल ते जून 2020 दरम्यान देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) हजारो कोटी रुपयांचा घोटाळा (Fraud) झाला आहे. त्यापैकी घोटाळ्याच्या घटनांच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ (State Bank of India) इंडिया आघाडीवर आहे, तर पैशाच्या बाबतीत सर्वाधिक फसवणूक ही बँक ऑफ इंडियाची (Bank of India) झाली आहे. माहितीच्या अधिकार (RTI) अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत देशातील सरकारी बँकांकड 19,964 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची 2,867 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी एसबीआयने एप्रिल ते जून 2020 मध्ये सर्वाधिक, 2,050 फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. या फसवणूकीच्या घटनांशी संबंधित रक्कम 2,325.88 कोटी रुपये आहे. बँक ऑफ इंडियाला पैशांच्या बाबतीत सर्वात जास्त तोटा झाला आहे. इथे 5,124.87 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 47 प्रकरणे उघडकीस आली आहेत. याशिवाय कॅनरा बँकेत 3,885.26 कोटी रुपयांच्या फसवणूकीचे 33, बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 2,842.94 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची 60 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन बँकेत 1,469.79 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 45 प्रकरणे उघडकीस आली आहेत, तर इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये 1,207.65 कोटी रुपयांच्या फसवणूकीच्या 37 घटना, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1,140.37 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 9 प्रकरणे समोर आली आहेत. यावेळी दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत (PNB) 270.65 कोटी रुपयांच्या फसवणूकीचे प्रकरण समोर आले आहेत. मात्र, बँकेकडे फसवणूकीच्या घटनांची संख्या 240 आहे.

(हेही वाचा: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त)

यूको बँकेत 831.35 कोटी रुपयांच्या फसवणूकीच्या 130 घटना समोर आल्या आहेत. त्याच वेळी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये 655.84 कोटी रुपयांच्या फसवणूकीची 149 प्रकरणे, पंजाब आणि सिंध बँक (PSB) मध्ये 163.3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 18 प्रकरणे आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (UBI) 46.52 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची 49 प्रकरणे आहेत. आरबीआयने प्रतिक्रिया म्हणून म्हटले आहे की, ही बँकांनी दिलेली प्राथमिक आकडेवारी आहे व ही बदलली जाऊ शकते.