काँग्रेस (Congress Party) नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) आणि रवींद्र वसंतराव चव्हाण (Ravindra Vasantrao Chavan) 28 नोव्हेंबर रोजी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. यासह, सध्या संसदेत सेवा बजावत असलेल्या गांधी कुटुंबातील प्रियंका गांधी या तिसऱ्या सदस्य बनल्या आहेत. वायनाड लोकसभा (Wayanad Election) मतदारसंघातून प्रियंका गांधी यांनी सीपीआय (CPI) उमेदवाराविरोधात 4,10,931 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचे भाऊ राहुल गांधी यांनी यापूर्वी 2019 आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाडची जागा जिंकली होती. मात्र, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे काँग्रेसने प्रियंकाला वायनाडमधून उमेदवारी दिली.
काँग्रेसचा आवाज लोकसभेत वाढणार
भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेमध्ये प्रियंका गांधी यांनी अधिकृत सदस्य म्हणून प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाचा आवाज आणखी मोठा होणार आहे. आपल्या संयत परंतू आक्रमक भाषणशैलीसाठी प्रियंका ओळखल्या जातात. त्यांच्यामध्ये त्यांची आजी दिवंगद पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही छबी पाहिली जाते. दरम्यान, त्यांचे बंधु राहूल गांधी हे लोकसभेचे विरोधीपक्षनेता आहेत. तर आई सोनिया गांधी या राज्यसभा खासदार आहेत. प्रियंका यांच्यामुळे भारतीय राजकारणात गांधी कुटुंबाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. (हेही वाचा, Wayanad by-election Result: वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा मोठा विजय)
रवींद्र चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय
काँग्रेसचे आणखी एक नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत नांदेड लोकसभा जागेवर विजय मिळवला. चव्हाण यांना 5,86,788 मते मिळाली होती. काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. ज्यामध्ये पुन्हा एकदा नांदेडच्या जनतेने चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत विजयी केले. या विजयामुळे अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
वायनाड आणि नांदेड येथील लोकप्रतिनिधी घेणार लोकसभेत शपथ
Congress leaders Priyanka Gandhi Vadra and Ravindra Vasantrao Chavan will take oath as Members of Parliament in the Lok Sabha today
They were elected to the House from Wayanad and Nanded respectively in the recent Lok Sabha by-polls. pic.twitter.com/cIh8KBMn7R
— ANI (@ANI) November 28, 2024
प्रियंका गांधी यांच्याकडून सोशल मीडियावर आभार प्रकट
निवडणूक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत "वायनाडमधील माझ्या सहकाऱ्यांनी आज माझे निवडणूक प्रमाणपत्र आणले. माझ्यासाठी, हा केवळ एक दस्तऐवज नाही, तर तुमच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि ज्या मूल्यांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्याचे ते प्रतीक आहे. वायनाड, तुमच्यासाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी हा प्रवास पुढे नेण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद ", असे त्यांनी आपल्यानिवेदनात म्हटले आहे.
अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत सरकारी कारवाईची मागणी
आपल्या शपथविधी सोहळ्याच्या आधी प्रियंका गांधी वाड्रा यांनी इस्कॉन बांगलादेशचे पुजारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेवर आणि बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली. "बांगलादेशातील इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्याच्या अटकेची बातमी आणि अल्पसंख्याक हिंदूंविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार अत्यंत चिंताजनक आहे", असे त्यांनी एक्स वर पोस्ट लिहीले. त्या पुढे म्हणाल्या, "मी केंद्र सरकारला आवाहन करते की त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि बांगलादेश सरकारसमोर अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करावा".