
''देशात 70 कोटी तरुण बेरोजगार आहेत. मागच्या दहा वर्षापासून समस्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे'', असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज लातूर येथील प्रचार सभेत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाबाहेर बाहेर फिरत आहेत आणि देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. मोदींपेक्षा मोठा नेता या देशात नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र देशात दहा वर्षात काय केलं, हे ते सांगत नाही. देशात महिला सुरक्षित नाहीत, गरिबी वाढली आहे.'' असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी केला आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण म्हणत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा)
''पाच किलो मोफत राशन घेऊन तुमच भविष्य बनणार आहे का? सोने, चांदी ,पेट्रोल-डिझेल, शिक्षण फी सर्व महाग झालं आहे.'' त्या म्हणाल्या, देशातल्या शेतकऱ्यांवर जीएसटी लावली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या 600 शेतकरी शहीद झाले.'' असे देखील प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. लोकशाही आणि संविधान आपलं रक्षण करते. मात्र लोकशाही आणि संविधान विरोधात भाजप सरकार जात असल्याचे प्रियंका यांनी म्हटलेय.
''भाजप सरकार संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात सरकार कसे स्थापन झालं, हे सर्वांना माहिती आहे. जिथे जिथे यांचे सरकार आहे, तिथे भ्रष्टाचार पसरला आहे.'' त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान तरुणांना रोजगार देऊ शकत नाहीत. महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाहीत, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ शकत नाही, मग अशा नेत्यांचा काय फायदा.'' असे देखील त्यांनी म्हटले आहे.