महिला लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई कोर्टाने (Mumbai Court) आज एक मोठा निर्णय दिला. मानवी शरीराचा 'खाजगी भाग' (Private Parts) याचा अर्थ 'आपल्या समाजा'मधील अर्थाच्या संदर्भानेच घ्यायला हवे असे कोर्टाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर लैंगिक अपराधांविरूद्ध विशेष मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा कोर्टाने एका 22 वर्षांच्या व्यक्तीला, 10 वर्षाच्या मुलीच्या पार्श्वभागावर स्पर्श केल्याबद्दल 5 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण 2017 मधील आहे. फिर्यादीनुसार, दहा वर्षांची मुलगी जवळच्या दुकानातून ब्रेड आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. घरी परत जाताना तिला स्टेशनरीच्या दुकानाबाहेर बसून तिच्याकडे बघत हसणारी चार मुले दिसली.
नंतर, ही मुलगी मित्रासह मंदिरात जाण्यासाठी पुन्हा घराबाहेर पडली. ती मुले अजूनही स्टेशनरी दुकानाबाहेरच होती. तेव्हा चार मुलांपैकी एक तिच्याजवळ आला आणि त्याने मुलीच्या खाजगी भागाला स्पर्श केला. या कृत्यानंतर चौघेही मुलीकडे पाहून हसू लागले. त्यांनतर मुलगी ताबडतोब घरी गेली आणि तिने आपल्या आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले, नंतर आईने फोनवर तिच्या नवऱ्याला याबाबत माहिती दिली. हा सर्व प्रकार ऐकून मुलीचे वडील ताबडतोब घरी आले. मुलीने वडिलांना घटनेबद्दल सांगितले आणि आरोपी सहार अली शेखने हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यावेळी मुलीच्या वडिलांना पाहून शेख तेथून पळून गेला.
यानंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि दुसर्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. नंतर खटल्याच्या वेळी आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला. कोर्टात सरकारी वकील सुलभा जोशी यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीने लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने मुलीच्या खासगी भागाला स्पर्श केला होता. यावर शेख याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मुलीच्या वडिलांना त्याच्या पत्नीने कोणीतरी आपल्या मुलीला ‘छेडले’ आहे असे सांगितले होते. छेडणे आणि स्पर्श करणे यात बराच फरक आहे. तसेच पार्श्वभाग हा काही खाजगी भाग नाही असे ते म्हणाले होते.
यावर कोर्टाने असा तर्क केला की, कदाचित घडलेल्या सर्व गोष्टीचा खुलासा पत्नीने फोनवर केला नसावा. बायकोने नवऱ्याला फोन केला, पत्नी घाबरली आहे हे समजल्यावर पतीने तातडीने घरी धाव घेतली. यावरून हे लक्षात येते की मुलीसोबत छेडछाडव्यतिरिक्त अजून काही घडले आहे. पती-पत्नीमध्ये घडलेले हे एक टेलिफोनिक संभाषण होते, म्हणून पत्नीने फोनवर तपशील देण्याऐवजी मुलीची छेड काढली आहे असे सांगितले असावे. (हेही वाचा: Shakti Bill Update: महाराष्ट्रात आम्ही लवकरच शक्ती बिल आणत आहोत- अनिल देशमुख)
पुढे, कोर्टाने म्हटले की, ‘खासगी भागाचा अर्थ आपल्या समाजात नक्की आहे त्याच संदर्भाने तो घ्यायला हवा. कदाचित ‘गुगल’ पार्श्वभागाला खासगी भाग समजत नसेल मात्र भारतीयांच्या दृष्टीने त्याचा जो अर्थ आहे तसाच तो घ्यायला हवा.’ न्यायाधीश एम.ए. बरलीया यांनी नमूद केले की, मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श करणे हे लैंगिक हेतूशिवाय असू शकत नाही. पीडितेने तिच्या पालकांना आणि पोलिसांना सांगितले की आरोपीने तिच्या खासगी भागाला स्पर्श केला. त्यावेळी ती अवघ्या 10 वर्षाची होती. तिने तिच्या भाषेत जे तिला समजले ते सांगितले. त्यामुळे आरोपीने मुलीला अयोग्यपणे स्पर्श केला असेच दिसून येते.
मुलीवर हसणे आणि नंतर तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करणे हे आरोपीचे वागणे लैंगिक हेतूनेच घडले असावे. लैंगिक हेतू मनाची अवस्था आहे, थेट पुराव्यांद्वारे हे सिद्ध केले जाऊ शकत नाही. अशावेळी घडलेल्या परिस्थितीवरून अनुमान लावले जाणे आवश्यक आहे. कोर्टाने शेखला 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला.