President Ram Nath Kovind confers National Teachers' Awards 2020 (Photo Credits: ANI)

आज शिक्षक दिन 2020 (Teachers Day 2020) निमित्ताने देशभरातील काही शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. National Award for Teachers साठी देशातील 47 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअली पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. गौरविण्यात आलेल्या 47 शिक्षकांपैकी 18 महिला होत्या, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तसंच विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनत, समर्पण आणि निष्ठा यांचे कौतुक करत पुरस्कार विजेत्या शिक्षकांना राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, "कोरोना व्हायरस संकटामुळे देशातील बहुतांश शाळा-कॉलेजेस बंद आहेत. अशावेळी शिक्षणाचे कार्य चालू ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांसाठी देखील सोपे नव्हते. परंतु, त्यांनी कमी वेळेत डिजिटल माध्यमाची ओळख घेतली आणि आता विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत." तसंच डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्यासाठी स्वतःचे कौशल्य अपग्रेड करणाऱ्या शिक्षकांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. पुढे ते म्हणाले की, "शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणास प्रोत्साहित करण्यासाठी पालकांशी संवाद साधण्याचीही गरज आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेत देखील मुले आनंदाने आणि स्वारस्याने शिकण्यास प्रेरित होतील."

ANI Tweet:

नव्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकांना तयार करण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे. यासाठी नव्या शिक्षकांची निवड करताना त्यांच्यातील हुशारी बरोबर आशावादी गुणधर्माचाही विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. उत्तम इमारत, महागडी उपकरणे किंवा सुविधांमुळे चांगली शाळा बनत नाही तर शिक्षकांची निष्ठा आणि समर्पण उत्तम शाळा घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. शिक्षक खरे राष्ट्रनिर्माता आहेत, असं म्हणत त्यांनी शिक्षकांचं महत्त्व अधोरेखित केलं.

दरम्यान राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त शिक्षकांशी झालेल्या भेटीमुळे मी आनंदीत आहे, असे म्हणत देशातील सर्व शिक्षकांच्या योगदानाबद्दल त्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.