Pregnant Elephant Death Case: मल्लपुरम येथे मनेका गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत केली होती वादग्रस्त विधाने
मनेका गांधी (Photo Credit: PTI)

काही दिवसांपूर्वी केरळ (Kerala) मध्ये गर्भवती हत्तीणीचा (Pregnant Elephant) वेदनादायक मृत्यू झाला होता, या घटनेनंतर देशात संतापाची लाट पसरली. यामुळे राजकारणही तापले व अनेक राजकारणी लोकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले. या हत्तीणीच्या निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनीही अनेक आरोप केले व निवेदने दिली. आता त्यातील एका व्यक्त्यव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील मल्लपुरम (Malappuram) मध्ये मनेका गांधी यांच्या विधानाबद्दल आयपीसीच्या कलम 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे की, त्यांनी धर्म, जाती, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारे वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवले. केरळ हे देशातील सर्वात हिंसक राज्य आहे, केरळमधील मल्लपुरम हे अशा घटनांसाठी कुख्यात असल्याचे भाजप खासदार मनेका गांधी यांनी म्हटले होते. मल्लप्पुरमविरूद्ध केलेल्या विधानांमुळे मनेका गांधी यांच्याविरूद्ध सातपेक्षा अधिक तक्रारी आल्या होत्या, मात्र त्यातील एका तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

मनेका गांधी यांनी पुढे म्हटले होते की, येथे लोक रस्त्यावर विष फेकतात ज्यामुळे एकाच वेळी 300 ते 400 पक्षी आणि कुत्री मरतात. केरळमध्ये दर तिसर्‍या दिवशी हत्तीचा मृत्यू होतो. मल्लपुरम प्रकरणात केरळ सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, त्यावरून असे वाटते की ते घाबरले आहेत. मनेका गांधी यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनीहीमनेकागांधी यांना हे निवेदन मागे घेण्यास सांगितले आहे होते. आता मनेका गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने मृत्यू; अज्ञात लोकांविरूद्ध FIR दाखल)

दरम्यान मनेका गांधी यांच्या विधानानंतर त्यांनी स्थापन केलेली एनजीओ, ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल' वेबसाइट शुक्रवारी काही लोकांच्या गटाने हॅक केली. गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू संदर्भात मलप्पुरम जिल्ह्याबद्दल त्यांनी दिलेल्या टिप्पणीवरून हे हॅकिंग करण्यात आले.